
डेंग्यू प्रतिबंधासाठी हिंदुस्थानला मोठे यश मिळाले असून, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) यांनी देशातील पहिल्या डेंग्यू लसीला बाजारात वापरासाठी मंजुरी दिली आहे. टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाने विकसित केलेल्या QDENGA या लसीला ही मान्यता मिळाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
ही लस 4 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींना देता येणार असून, यापूर्वी डेंग्यू झाला आहे की नाही, याचा या लसीवर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच, डेंग्यूचा पूर्वी संसर्ग झाला नसला तरीही ही लस घेता येणार आहे. विशेष म्हणजे, इतर काही डेंग्यू लसींप्रमाणे ही लस घेण्यापूर्वी डेंग्यूचा पूर्वी संसर्ग झाला होता का, यासाठी कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही. त्यामुळे पात्र नागरिकांना थेट लसीकरण करता येणार आहे.
टाकेडा कंपनीने सांगितले की, 2022 मध्ये लाँच झाल्यानंतर QDENGA ला आतापर्यंत 43 देशांमध्ये मंजुरी मिळाली असून, जगभरात 3 कोटी 20 लाखांहून अधिक डोस वितरित करण्यात आले आहेत. हिंदुस्थानातील ही मंजुरी डेंग्यूविरोधातील लढ्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
टाकेडाच्या इंटरकॉन्टिनेंटल मार्केट्सचे प्रमुख महेंद्र नायक यांनी सांगितले की, सात वर्षांच्या दीर्घकालीन अभ्यासातून ही लस डेंग्यूच्या सर्व चार विषाणू प्रकारांपासून (Serotypes) संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करण्यास प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. हिंदुस्थानात घेण्यात आलेल्या फेज-3 DEN-302 क्लिनिकल चाचणीचे निष्कर्षही मंजुरीसाठी विचारात घेण्यात आले. या चाचणीत 4 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये लसीची सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक प्रतिसादाची तपासणी करण्यात आली.
QDENGA लसीचे 0.5 मिलीचे दोन डोस दिले जातात. हे दोन्ही डोस त्वचेखाली दिले जात असून, त्यामध्ये तीन महिन्यांचे अंतर ठेवले जाते. टाकेडाच्या दक्षिण-पूर्व आशिया आणि हिंदुस्थान विभागाचे वैद्यकीय प्रमुख गोह चू बेंग यांनी सांगितले की, हिंदुस्थानात डेंग्यूच्या चारही विषाणू प्रकारांचा प्रसार होत असल्याने ही लस त्यांच्यापासून संरक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. डेंग्यू प्रतिबंधासाठी डास नियंत्रण, देखरेख, जनजागृती आणि सार्वजनिक आरोग्य उपायांसोबत ही लस महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) डेंग्यूचा प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्ये QDENGA लसीचा वापर करण्याची शिफारस केली आहे. तसेच, लसीकरणापूर्वी डेंग्यू संसर्गाची तपासणी न करता उच्च जोखमीच्या भागांतील सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करण्यालाही WHO ने पाठिंबा दिला आहे.
डेंग्यू हा डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार असून तो 125 हून अधिक देशांमध्ये आढळतो. टाकेडाच्या माहितीनुसार, जगातील डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास एकतृतीयांश भार हिंदुस्थानावर आहे. झपाट्याने होणारे शहरीकरण, हवामानातील बदल आणि डासांची वाढती पैदास यामुळे देशात डेंग्यूचा धोका सातत्याने वाढत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.




























































