
कारने प्रवास करत असताना पुणे जिल्हाधिकारी ऑनलाईन सुनावणीस हजर झाले. यावर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. पुणे जिल्हाधिकारी यांनी अशा निष्काळजीपणाने वागायला नको होते, असे कडक ताशेरे न्यायालयाने ओढले.
आम्ही पुणे जिल्हाधिकारी यांना ऑनलाईन सुनावणीस हजर राहण्यास परवानगी दिली होती. ते प्रवास करत असताना ऑनलाईन सुनावणीला हजर झाले, हे बघून आम्हाला धक्का बसला. यातून पुणे जिल्हाधिकारी यांचा कोर्ट व सुनावणीप्रति असलेला तुच्छ आदर स्पष्टपणे दिसते, असे न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठाने फटकारले.
पुण्यातील बिल्डरने घर खरेदी करणाऱयांची फसवणूक केली. त्याची मालमत्ता विकून घर खरेदी करणाऱयांचे पैसे परत करण्याचे आदेश महारेराने दिले. बिल्डरने पैसे परत करण्याची तयारी दर्शवली. तरीदेखील शिरुर तहसीलदार यांनी लिलावाची प्रक्रिया केली. याविरोधात बिल्डरने न्यायालयाचे दार ठोठावले. हा लिलाव रद्द करत न्यायालयाने बिल्डरला घर खरेदी करणाऱयांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले.





























































