सरकराने जंतरमंतरवर येऊनच चर्चा करावी, आम्ही सरकारकडे जाणार नाही – अभिजीत दिपके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हे दिल्ली पोलीस नसून गुंड आहेत, त्यांच्यामुळे 150 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले अशी माहिती कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिली. तसेच सरकारने जंतरमंतरवर येऊनच चर्चा करावी, आम्ही सरकारकडे जाणार नाही, असेही अभिजीत दिपके म्हणाले.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत अभिजीत दिपके म्हणाले की, अतिशय हिंसक पद्धतीने दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केली आहे. दिल्ली पोलिसांनी 12 वर्षांच्या मुलांची डोकी फोडली आहेत. पोलिसांनी लहान मुलींना मारहाण करून त्यांच्या छातीवर पाय दिला आहे. मुलांना जीवे मारण्याचे पोलिसांनी निर्देश होते का? 20 हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूसाठी धर्मेंद्र प्रधान जबाबदार आहेत. त्यांना वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणखी मुलांचे रक्त सांडत आहेत का? आणखी मुलं जखमी होऊ नये म्हणून आम्ही कालचं आंदोलन स्थगित केलं. सरकारला मुलांच्या जिवाची काही किंमत नाही हे कालच्या घटनेवरून लक्षात आलं. ज्या पद्धतीने मुलांना मारहाण झाली आहे त्यावरून स्पष्ट होतं की सरकारने पोलिसांना आदेश दिले होते की कुणाचा मृत्यू झाला तरी चालेल, पण यांनी पुन्हा सरकारला प्रश्न विचारता कामा नये. मार्च थांबवायचाच होता तर पाण्याचे फवारे मारूनही थांबवता आलं असतं पण त्यांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुरांचा मारा केला. काल दिल्ली पोलिसांकडून पहिल्यांदा हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर हा गदारोळ झाला. एका मुलीची प्रकृती गंभीर आहे, तिच्या गळ्यावर पोलिसांनी जोरात लाठी मारली. जर त्या मुलीला काही झालं तर त्यासाठी दिल्ली पोलीस आणि पंतप्रधान मोदी जबाबदार असतील. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे 150 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्या पद्धतीने ही मारहाण करण्यात आली आहे, त्यावरून देशात लोकशाही नसून हुकुमशाही सुरू आहे. आंदोलनाच्या ठिकाणी दगड घेऊन आलेली गाडी कशी आली? या भागात पोलिसांच्या परवानगीशिवाय काहीच होऊ शकत नाही, आंदोलनाला येणाऱ्या प्रत्येकाची बॅग तपासली जात आहे. बॅरिकेड्स लावून पूर्ण भाग बंद केला आणि कुणालाही आत येऊ दिलं जात नव्हतं. अशा वेळी दगड आणि विटा भरलेला ट्रक कसा काय आला? दिल्ली पोलिसांनी याचे उत्तर द्यावे. काल काही सिव्हील ड्रेसमधल्या लोकांच्या हाती लाठ्या देण्यात आल्या होत्या. 12 वर्षांच्या मुलांवर हात उचलतात, लाजा नाही वाटत यांना. काल सोनम वांगचुक आपले उपोषण संपवणार होते, आम्ही त्यांना मिन्नतवारी करून त्यांना यासाठी राजी केलं होतं. पण कालची पोलिसांची हिंसा पाहून त्यांनी उपोषण सुरुच ठेवलं. त्यांच्या पत्नीशी मी चर्चा केली त्यांनी सांगितले की वांगचुक यांचे शरीर 20-23 दिवसांचे उपोषण करू शकते. त्यानंतर वांगचुक यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. आता धरणे आंदोलन असंच सुरू राहणार आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आमच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं, पण आमच्याच नेत्यांना जे पी नड्डा यांच्या घरात कैद केलं होतं, त्यांचे मोबाईल जप्त केले होते. आता सरकारला जर चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतर मंतरवर यावं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, असेही अभिजीत दिपके म्हणाले.

आमच्या आंदोलनाचा आंतरराष्ट्रीय संबंध आहे म्हणून तुम्ही काय मुलांची डोकी फोडणार का? या सरकारला भान आहे की नाही? माझे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत तर चौकशी करा आणि माध्यमांसमोर सगळ्यांना सांगा, असे आव्हान अभिजीत दिपके यांनी सरकारला दिले आहे.