
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यात विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी बंद, मूकमोर्चे, रास्ता रोको आणि निदर्शने केली. अनेक शहरांत व्यापारी आस्थापना बंद राहिल्या, तर विविध ठिकाणी निवेदने देत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
बुलढाणा शहरात ‘संवेदनशील बुलढाणेकर’ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याची चौकशी, संबंधित पोलिसांवर कारवाई, आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे आणि पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
नांदुरा, खामगाव, चिखली, लोणार, देऊळगाव मही आणि मोताळा येथेही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नांदुरात बंदसोबत काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर चिखलीत वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला आणि काँग्रेसने स्वतंत्र निदर्शने केली. खामगावमध्ये व्यापारी, शाळा व महाविद्यालयांनी बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दिला. लोणारमध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली, तर मोताळा फाटा येथे महाविकास आघाडीने रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेण्याची, परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. जिल्हाभरातील बहुतांश आंदोलने शांततेत पार पडली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल्याची माहिती प्रशासनाने दिली.






























































