NEET Exam – फेरपरीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे या विद्यार्थिनीने नीट फेरपरीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून राहत्या घरामध्ये गळफास घेऊन जीवन संपवले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंकिता सुरेश सांगळे (19 वर्षे) असे त्या विद्यार्थीनीचे नाव असून तिला फेरपरीभेत 166 गुण मिळाले होते. अंकिताने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहली असून कमी गुण मिळाल्याने नैराश्य आल्याचे तिने या नोटमध्ये म्हटले आहे.

अंकिता सुरेश सांगळे हिने 21 जून रोजी नीटची फेरपरीक्षा दिली होती. या परिक्षेत तिला 166 गुण मिळाले. कट ऑफ गुणे हे 177 होते. अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून अंकिता मानसिक तणावात होती. 25 जुलै वडील आणि भाऊ पंढरपूर येथे दर्शनासाठी गेलेले होते. घरामध्ये आई होती परंतु ती कामामध्ये व्यस्त होती त्यावेळी अंकिताने तिला अभ्यासासाठी दिलेल्या स्वतंत्र खोलीत गळफास घेतला. बराच वेळ झाला तिचा काही आवाज किंवा हालचाल दिसली नाही म्हणून आईने खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं तर अंकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. शेजारच्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर अंकिताचा मृतदेहावर रुग्णालयामध्ये शिवविच्छेदन करण्यात आले.

अंकिताने सुसाईड नोट लिहली असून त्यात तीने आपल्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. ”परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने मला नैराश्य आले आहे. डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले नाही. या आत्महत्येसाठी माझे आई-वडील भाऊ यापैकी कोणालाही जबाबदार धरू नये”, असे तिने चिठ्ठीत म्हटले आहे.

अंकिता हिला डॉक्टर व्हायचे होते. 3 मे रोजी तिने नीट ची परीक्षा दिली यामध्ये तिला चांगले गुण मिळाले होते. मात्र पेपर फुटल्यामुळे पुन्हा 21 जून रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये तिला 166 गुण मिळाले. 177 गुणांना कट ऑफ होते. आपण क्वालिफाईड झालो नाही याची खंत तिला वाटत होती. यामुळे तिला नैराश्य आले होते आणि या मधूनच तिने आत्महत्या केली आहे असे अंकिताचे काका अण्णासाहेब सांगळे यांनी सांगितले.