सामना अग्रलेख – प्रधान गेले; बडा प्रधानही जाईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकार आता पेपरफुटीविरुद्ध एक नवे विधेयक घेऊन येत आहे. पेपर फोडणाऱ्यांना 10 वर्षे तुरुंगवास आणि 10 कोटींचा दंड ठोठावणारा हा कायदा तसा जुनाच आहे. फक्त दंड आणि शिक्षेच्या आकड्यात बदल केला. हे बिल म्हणजे विद्यार्थी व पालकांना मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. अमित शहा यांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले. प्रसंगी गोळ्या चालवा असेही आदेश होते. त्यामुळे अमित शहांनाही मोकळे सोडता येणार नाही आणि ‘जंतर मंतर’वरील अमानुष कृत्याबद्दल पंतप्रधान मोदी यांना देशाची माफी मागावीच लागेल. धर्मेंद्र प्रधान गेले म्हणून विषय संपला असे होणार नाही. ‘बडा प्रधान’ व त्यांचा कारभार देशाला घातक आहे. अमित शहांसारखे हस्तक रक्तपिपासू आहेत. असंतोषाचा भडका त्यांच्या विरोधातही होईल.

भारतीय तरुणांच्या असंतोषाचा स्फोट झाला. त्या स्फोटात मोदींचे सरकार पूर्ण हादरून गेले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे त्या स्फोटाचे पहिले बळी ठरले. ‘मोदी कभी झुकता नही, ते अजेय आहेत’ या कोरीवकामाला साफ तडे गेले आहेत. 30-35 दिवस ‘जंतर मंतर’वर विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन सुरू होते. अभिजीत दीपकेने अमेरिकेतून येऊन कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. ‘नीट’ परीक्षांच्या पेपरफुटीवरून आवाज उठवला. त्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात झाले. सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाने त्या वणव्यात नैतिकतेची समीधा पडली. या झुरळांपुढे काय वाकायचे, ही मोदी सरकारची पहिल्यापासूनची भूमिका होती. इतक्या भल्या भल्यांना सत्तेच्या बळावर चिरडले तेथे ही झुरळे कोण! या मस्तीत सरकार होते. झुरळांवर पोलिसांनी दंडुके चालवले, बंदुका रोखल्या, पण झुरळांनी ‘जंतर मंतर’ सोडले नाही. धर्मेंद्र प्रधान यांना बाजूला ठेवून तरुणांनी पंतप्रधान मोदींनाच लक्ष्य करायला सुरुवात केली तेव्हा मोदी यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन तूर्तास स्वतःची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न केला. प्रधान यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असे शेवटपर्यंत सांगितले गेले, ‘एन.डी.ए.त राजीनामा घेण्याची पद्धत नाही’ अशी अहंकारी भाषा राजनाथ सिंह यांच्यासारखे मंत्री करत राहिले, पण शेवटी सरकारने प्रधानांचा राजीनामा घेतला. प्रधान यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, ‘10 दिवसांतील घडामोडींनी आपण अत्यंत व्यथित झालो आहोत. ‘जंतर मंतर’वरील परिस्थितीचा गैरफायदा देशविरोधी शक्तींनी घेऊ नये, देशाची एकता

अबाधित राहावी

यासाठीच आपण राजीनामा देत आहोत.’ प्रधान यांचे राजीनाम्यातील हे दावे खोटे आहेत. 10 दिवसांतील कोणत्या घडामोडींनी ते व्यथित झाले? गृहमंत्री अमित शहांच्या आदेशाने दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर निर्घृण हल्ले केले. पोरापोरींची डोकी फोडली. त्या दुःखद प्रसंगाने आपण व्यथित झालो असल्याचे प्रधान यांनी कोठेच म्हटले नाही. देशभरातील पोरं मोदी-शहांच्या नावाने शिमगा करीत आहेत. त्यामुळे ते व्यथित झाले असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत दुःखाचा प्रसंग आहे. परिस्थितीचा गैरफायदा देशविरोधी शक्तींनी घेऊ नये म्हणून मंत्रीपद त्यागले असे सांगणे हा ‘जंतर मंतर’वर उसळलेल्या भारतीय असंतोषाचा अपमान आहे. कोणत्या देशविरोधी शक्ती त्यांना ‘जंतर मंतर’वर किंवा देशभरातील आंदोलनात दिसल्या? सोनम वांगचुक यांना चीनचे एजंट ठरवण्याचे काम भाजपने या काळात केले. त्याच भाजपचे मंत्री इस्पितळात जाऊन वांगचुक यांच्या हातापाया पडत होते. वांगचुक हे देशातील तरुणांच्या भविष्यासाठी उपोषण करत होते. त्यांच्या बरोबर नेहा बोरासारखे विद्यार्थी नेते उपोषण करीत होते. या देशविरोधी शक्ती आहेत असे प्रधान यांना वाटते. मग अशा देशविरोधी शक्तींपुढे मोदी सरकारला झुकण्याचे कारण नव्हते. सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा बळजबरीने घेतला आहे व शेवटी ते म्हणतात, देशाची एकता अबाधित राहावी म्हणून मी खुर्ची सोडत आहे. प्रधान यांच्या

राजीनाम्याचा व राष्ट्रीय एकतेचा

संबंध नाही. नीट पेपरफुटीमुळे 20 मुलामुलींनी आत्मबलिदान केले. त्या बलिदानातून असंतोष भडकला व देश एकवटला. प्रधान यांना हे माहीत नसेल तर ते शिक्षण मंत्रीपदास कधीच लायक नव्हते हेच खरे. मोदी, शहा व त्यांचे सरकार ‘जंतर मंतर’वर एक चेष्टेचा विषय ठरले. 35 दिवस ‘जंतर मंतर’वर मोदी व त्यांच्या सरकारची पूर्णवेळ चंपी सुरू होती. तरुणांच्या कल्पकतेला आणि डिजिटल तंत्रज्ञानाला धुमारेच फुटले होते. भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलला जवळ जवळ टाळेच लागले आहे. ‘जंतर मंतर’वरील आंदोलनाचे हे एक मोठे फलित आहे. सरकार आता पेपरफुटीविरुद्ध एक नवे विधेयक घेऊन येत आहे. पेपर फोडणाऱ्यांना 10 वर्षे तुरुंगवास आणि 10 कोटींचा दंड ठोठावणारा हा कायदा तसा जुनाच आहे. फक्त दंड आणि शिक्षेच्या आकड्यात बदल केला. हे बिल म्हणजे विद्यार्थी व पालकांना मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. अमित शहा यांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले. प्रसंगी गोळ्या चालवा असेही आदेश होते. त्यामुळे अमित शहांनाही मोकळे सोडता येणार नाही आणि ‘जंतर मंतर’वरील अमानुष कृत्याबद्दल पंतप्रधान मोदी यांना देशाची माफी मागावीच लागेल. धर्मेंद्र प्रधान गेले म्हणून विषय संपला असे होणार नाही. ‘बडा प्रधान’ व त्यांचा कारभार देशाला घातक आहे. अमित शहांसारखे हस्तक रक्तपिपासू आहेत. असंतोषाचा भडका त्यांच्या विरोधातही होईल.