
पेपरफुटीविरोधात संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घेरले आहे. ‘विद्यार्थ्यांवर जीवघेणे हल्ले करण्याचे, पेलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले याचे उत्तर द्या,’ अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल यांनी यासंदर्भात अमित शहांना खुले पत्र लिहिले आहे. ‘देशातील विद्यार्थ्यांनी अत्यंत रास्त मागणी घेऊन मोर्चा काढला होता. शिक्षणव्यवस्थेतील गोंधळाची जबाबदारी निश्चित करा एवढेच त्यांचे म्हणणे होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी सुरक्षा दलांनी त्यांच्यावर अमानुष हल्ले केले. पाण्याचे, अश्रूधुरांचे फवारे सोडले. विद्यार्थिनींनाही सोडले नाही. यात शेकडो विद्यार्थी जखमी झाले. पेलेट गनचाही वापर करण्यात आला. त्यात पत्रकारांसह काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. पेलेट गनच्या माऱ्यामुळे साहील लोचब नावाच्या विद्यार्थ्याचा डोळा निकामी होण्याची भीती आहे याकडे राहुल गांधी यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे. या हल्ल्यांची जबाबदारी निश्चित करा, असेही राहुल यांनी पत्रात म्हटले आहे.
दीपकेंनी घेतली कपिल सिब्बल यांची भेट
सीजेपीने आंदोलन मागे घेतल्यानंतरही दिल्लीत घडामोडी सुरूच आहेत. सीजेपीचे अभिजित दीपके यांनी आज ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांची भेट घेतली. कायदेशीर बाबींवर या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.
देशाला या प्रश्नांची उत्तरे हवीत!
विद्यार्थ्यांविरोधात पेलेट गनसारख्या घातक शस्त्रांचा वापर करण्याची परवानगी गृहमंत्री म्हणून तुम्ही दिली होती का? तुम्ही दिली नसेल तर कुणी दिली?
साध्या वेषात विद्यार्थ्यांवर लाठीमार करणारे कोण होते? ते पोलीस होते की स्वयंसेवक होते? त्यांना कोणाच्या आदेशाने तैनात केले होते?























































