
पेपरफुटीविरोधी आंदोलनात प्रचंड यश मिळवून जेन-झींनी आंदोलन मागे घेतले असले तरी सरकारची परीक्षा संपलेली नाही. संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडय़ातील पहिल्याच दिवशी सरकारला अवघड पेपर द्यावा लागणार आहे. जेन-झी आंदोलकांवरील हल्ल्यावरून विरोधक सरकारला जाब विचारण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा जेन-झी आंदोलनामुळे गाजला. पेपरफुटीवर चर्चा करण्याची व धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी इंडिया आघाडीने संसदेत लावून धरली होती. सरकारने चर्चेची तयारी दाखवली. मात्र, आधी प्रधान यांचा राजीनामा घ्या, नंतर चर्चा करू असा आग्रह विरोधकांनी धरला. त्यामुळे सरकारची कोंडी झाली. लोकसभा व राज्यसभेचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले.
प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे आता पेपरफुटीवर चर्चेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्यामुळे सरकार पुन्हा अडचणीत आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत हा मुद्दा उठवण्याचे संकेत दिले आहेत. विद्यार्थ्यांवरील हल्ल्याप्रकरणी अमित शहा यांनी जबाबदारी निश्चित करावी. तसेच पंतप्रधान मोदी यांनी सर्व विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशीही मागणी राहुल यांनी केली आहे. त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडाही वादळी ठरणार आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात भाजप खासदाराच्या मुलीची पोस्ट चर्चेत
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दोन राज्यांतील भाजपच्या नेत्यांच्या कन्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी मोदी सरकारविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्या असून पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन घोषणाबाजीदेखील केली. त्यांनी या पोस्ट हटविण्यासदेखील नकार दिला आहे. ओडिशातील खासदार अपराजिता सारंगी यांची मुलगी अर्चिता राहर हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली, तर आसाम सरकारमधील मंत्री केशव महंत यांची मुलगी दिबीसा ही ‘नीट’ पेपरफुटीविरोधातील आंदोलनात सहभागी झाली होती.
राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दाही गाजणार
अयोध्येच्या राम मंदिरात झालेल्या देणगी चोरीचा मुद्दाही संसदेत गाजणार आहे. राम मंदिरातील चोरीविरोधात शिवसेनेने महाराष्ट्रात जोरदार रामरक्षा आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्ष आता मंदिर देणगी चोरीवरूनही भाजप सरकारला जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.























































