तुम्ही राजीनामा दिला नाही, आम्ही तुमच्या छाताडावर बसून घेतलाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवतीर्थावरील जल्लोष मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी केंद्र सरकार आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिल्या. मंत्रिपदाचा त्याग केला असे राजीनामा देताना प्रधान म्हणाले होते. त्यावर एका तरुणीने पोस्टर बनवले होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, आम्ही त्यांच्या छाताडावर बसून घेतलाय असा संताप व्यक्त करत तिने तसा मजकूर लिहिलेले पोस्टर झळकवले.

काँग्रेस सरकारच्या काळात 15 वर्षांपूर्वीही पेपरफुटीच्या घटना घडत होत्या, असा सवाल भाजपवाले विचारत असल्याचे या तरुणीला सांगितले असता, काँग्रेसच्या काळात आम्ही डायपरमध्ये होतो, आम्ही झेन जी आहोत, त्यामुळे तो प्रश्न तुम्ही त्यावेळी तरुण असलेल्या मिलेनियल्सला किंवा त्यांच्या आई वडिलांना जाऊन विचारा, अशी भावना तिने बोलून दाखवली. मंत्रिपदाचा त्याग करतोय म्हणणाऱया प्रधान यांनी कसला त्याग केलाय? 21 मुलांनी आत्महत्या केली तो त्याग केला का? की दिल्ली पोलिसांनी मुलींना मारहाण केली तो त्याग केला? कोणता त्याग केला? असा संतापही या तरुणीने व्यक्त केला.

ठाकरेंचे मानले आभार

नीट पेपरफुटीविरोधात देशभर सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला शिवसेनेने अगदी सुरुवातीपासून पाठिंबा दिला होता. त्यामुळे दिल्लीत ‘जंतर मंतर’वर सुरू झालेल्या आंदोलनाची धग मुंबईसह महाराष्ट्र आणि देशभरात पोहोचली. याबद्दल तरुणाईने शिवसेनेचे आभार मानणारे फलक, पोस्टर्स आज झळकवली. ‘ठाकरे, मुंबईची पोरे तुम्हाला कायम लक्षात ठेवतील’, किंवा ‘तुमच्याकडे असतील भरपूर चाकरे, सामान्य जनतेचा एकच उपाय-फक्त ठाकरे’, असे फलक तरुणांच्या हाती होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोही झळकवण्यात आले.

मोदी सरकारच्या हुकुमशाही कारभाराला जनता पंटाळली असून त्याविरोधात सर्वत्र तीव्र संताप आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला असला तरी जनतेचा रोष कायम आहे हे दर्शविणारे बोलके पोस्टर.

दिल्लीत पोलिसांनी आंदोलनकर्त्या मुलांवर लाठीमार केला होता. म्हणून पोलीस काका मला मारू नका, असे ही चिमुरडी सांगतेय… तर तिच्या वडिलांनी तिला उत्तर देताना झळकवलेले अनोखे पोस्टर लक्षवेधी ठरले.

जेन झींचे क्रिएटिव्ह माइंड अन् हटके पोस्टरबाजी

जेन झी म्हणजे भलतीच क्रिएटिव्ह मुले. रील्स आणि मीम्सच्या जवळ असलेली, पण त्यातून व्यवस्थेला प्रश्न विचारणारी, चौकटीबाहेरचा विचार करणारी ही पिढी आहे. त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा शिवतीर्थावर आला. मुलांच्या हाती भन्नाट फलक, बोर्ड होते. त्यातून ती व्यक्त होताना दिसत होती. क्रिएटिव्ह फलक झळकवून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राजीनामा दिलेले धर्मेंद्र प्रधान आदींवर हटके पद्धतीने उपहासात्मक टीका करत होते. ‘पहला गडी गारद’ म्हणत आनंद साजरा करत होते. कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निर्मला सीतारामन यांना अप्रत्यक्ष इशारा देत होते. यासंदर्भातील त्यांची मार्मिक पोस्टर्स लक्ष वेधून घेत होती.

अभिजीत दीपके याचे कौतुक

विजयी जल्लोषात सहभागी तरुणाईने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपके यांची पोस्टर्स झळकवली. ‘एका मराठी मुलाने दिल्ली जिंकली ती फक्त संविधानामुळे’ अशा शब्दांत अभिजीत दीपकेचे काwतुक केले. ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा,’ असा अभिमान युवकांच्या चेहऱयावर दिसत होता.

घोषणाबाजीने परिसर गेला दणाणून

विजयी जल्लोषाच्या निमित्ताने तरुणाई आपल्या मनातील भावना व्यक्त करत होती. ‘बोल के लब आजाद है तेरे…’ असाच भाव प्रत्येकाच्या चेहऱयावर होता. कोणतीही भीती न बाळगता मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात येत होती. ‘जब जब मोदी डरते है, हिंदू-मुस्लीम करते है’, ‘नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘वंदे मातरम’, ‘जय भीम’ने परिसर दणाणून गेला.

‘त्या’ 21 मुलांना न्याय द्या

‘नीट’ पेपरफुटीमुळे 21 मुलांचा मृत्यू झाला. त्याविरोधात देशभरात तीव्र संताप आहे. या मृत विद्यार्थ्यांना न्याय द्या, असा आवाज उठला.

भाजपच्या पापाचा घडा भरला…

‘नीट’ पेपरफुटी आंदोलनात विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱया मोदी सरकारविरोधात जनतेच्या मनात खूप संताप आहे. विजयी जल्लोषात हा संताप विविध प्रकारे व्यक्त करण्यात येत होता. महिला- पुरुष मातीचे घडे डोक्यावर ठेवत छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पोचले. भाजपच्या पापाचा घडा भरलाय, अशा घोषणा त्यांनी दिल्या. ‘विद्यार्थ्यांचा संघर्ष म्हणजे देशाचा संघर्ष’ असे पोस्टर्स त्यांनी झळकवले.