अमित शहा कुठे लपले आहेत? विद्यार्थ्यांवरील पेलेट गन आणि एके-४७ च्या वापरावरून काँग्रेस आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या कारवाईवरून विरोधकांनी आता केंद्र सरकारवरील हल्लाबोल अधिक तीव्र केला आहे. काँग्रेसचे लोकसभा खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संसदेत येऊन दिल्लीत विद्यार्थ्यांवर पेलेट गन आणि बिहारमध्ये एके-४७ च्या वापराबाबत स्पष्टीकरण देण्याची थेट मागणी केली आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

सध्याचे सरकार बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर एके-४७ आणि दिल्लीत पेलेट गनचा वापर करत असल्याचा आरोप करत आमची मागणी अत्यंत स्पष्ट असल्याचे के. सी. वेणुगोपाल माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले आहेत. गृहमंत्री कुठे आहेत आणि ते कुठे लपले आहेत, याचे उत्तर देशाला मिळायला हवे, असे ते म्हणाले. अमित शहा यांनी लोकसभेत येऊन बिहारमध्ये एके-४७ आणि दिल्लीत पेलेट गन चालवण्याचे आदेश नेमके कोणी दिले, हे स्पष्ट करावे, अशी मागणी वेणुगोपाल यांनी केली आहे. या सर्व अत्याचारांना तेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा लोकांचा समज होत असल्याचेही ते म्हणाले.

काँग्रेसचे नेते आणि खासदार मनीष तिवारी यांनीही निशस्त्र आंदोलकांवर झालेल्या या बळाच्या वापरावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. निशस्त्र आणि अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर पेलेट गन आणि एके-४७ चा वापर करणे अजिबात समर्थनार्ह नसल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आंदोलने हाताळण्यासाठी एक प्रमाणित कार्यप्रणाली घालून दिली आहे. मात्र, ज्या प्रकारे निशस्त्र विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर झाला आणि बिहारमधून एके-४७ घेतलेल्या पोलिसाचे व्हिडीओ समोर येत आहेत, ती निव्वळ क्रूरता आणि अमानुषता असल्याची टीका तिवारी यांनी केली.