चिमुकलीच्या आजाराचे तब्बल 7 वर्षे डॉक्टरांचे निदान चुकले; अखेर खरे कारण समजल्यावर सगळेच चक्रावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील एका 10 वर्षाच्या मुलीच्या आजाराचे चुकीचे निदान करत तब्बल सात वर्षे तिच्यावर उपचार सुरू होते. पालकांनी अनेक रुग्णालयात नेले, मात्र मुलीचा त्रास जैसे थे होता. अखेर सात वर्षांनी मुलीच्या त्रासाचे खरे कारण समोर आले अन् सारेच चक्रावले. मात्र सात वर्ष मुलीच्या आजारपणाचे अचूक निदान न झाल्याने तिच्या फुफ्फुसावर याचे परिणाम झाले. यामुळे तिच्या फुफ्फुसाचा काही भाग काढून टाकावा लागला.

नेमकं प्रकरण काय?

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, मायशा नावाच्या मुलीला लहानपणापासून सतत खोकला आणि वजन कमी होण्याची समस्या होती. तिच्या पालकांनी तिला अनेक डॉक्टरांना नेले. मात्र तिच्या आजाराचे नेमके कारण समजू शकले नाही. तिला अनेकदा अँटीबायोटिक्स देण्यात आले. थुंकीची चाचणी नकारात्मक येऊनही तिची क्षयरोगासाठी तपासणी करण्यात आली. नंतर तिला दमा असल्याचे निदान करून इनहेलर्सद्वारे उपचार दिले गेले. या आजारांवर उपचार घेऊनही तिची लक्षणे कायम राहिली, ज्यामुळे डॉक्टरही गोंधळून गेले होते.

अखेर तिला एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये (नारायण हेल्थ) दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिचे सीटी स्कॅन केले असता तिच्या डाव्या फुफ्फुसाचा काही भाग निकामी झाल्याचे दिसून आले. या तपासणीमुळे केवळ संसर्गामुळे नाही तर एखाद्या अडथळ्यामुळे मुलीला श्वासोच्छवासाच्या वारंवार समस्या होत असाव्यात, असा संशय डॉक्टरांना आला.

डॉक्टरांनी मुलीची ब्रॉन्कोस्कोपी केली आणि त्यांना डाव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागातील श्वासनालिकेजवळ प्लास्टिकच्या पेनचे झाकण अडकलेले आढळले. डॉक्टरांनी ईएनटी तज्ज्ञांच्या मदतीने ही हे झाकण यशस्वीरित्या बाहेर काढले. पेनचे झाकण काढल्यानंतर मायशाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. या अडकलेल्या वस्तूमुळे झालेल्या दीर्घकालीन संसर्गामुळे तिच्या फुफ्फुसाच्या काही भागाचे कायमस्वरूपी नुकसान झाले होते. यानंतर शल्यचिकित्सकांनी बाधित फुफ्फुसाचा जवळपास एक-तृतीयंश भाग काढून टाकला. ती आता चांगली बरी होईल आणि सामान्य जीवन जगू शकेल, अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.