
नवी दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील एका खासगी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा कारणे दाखवा नोटीस न देता ही कारवाई केल्याचा आरोप प्राध्यापकाने केला आहे. तर शैक्षणिक परिसरात कोणत्याही राजकीय घडामोडी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण महाविद्यालय व्यवस्थापनाने दिले आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली येथील गन्ना उत्पादक पीजी कॉलेजमधील वाणिज्य (कॉमर्स) विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मोहित भारद्वाज यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. देशातील पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात २० जुलै रोजी जंतरमंतरवर आंदोलन झाले होते. या आंदोलनातून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्राचार्यांनी डॉ. भारद्वाज यांना बोलावून नोकरीवरून कमी करण्यात आल्याचे तोंडी सांगितले. आंदोलनात सहभागी झाल्याचे काही व्हिडीओ व्यवस्थापनाच्या हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा डॉ. भारद्वाज यांनी केला आहे.
या बडतर्फीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, कारवाईपूर्वी कोणतीही विभागीय चौकशी झाली नसल्याचे डॉ. भारद्वाज यांनी म्हटले आहे. आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी वैयक्तिक पातळीवर या आंदोलनात गेलो होतो. त्यामुळे कोणतेही गैरवर्तन केलेले नाही, असा बचाव त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासन आणि महाविद्यालय व्यवस्थापनाला पत्र लिहून तक्रारींची आणि कारवाईच्या नोंदींची प्रत मागितली आहे.
बडतर्फीच्या पत्रात डॉ. भारद्वाज यांच्याविरोधात वारंवार तक्रारी आल्याचे कारण देण्यात आले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांच्या सेवेदरम्यान आपल्यावर एकही शिस्तभंगाची कारवाई झाली नसून यापूर्वी कोणतीही तक्रार आली नव्हती, असे सांगत त्यांनी व्यवस्थापनाचे आरोप फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे यावर महाविद्यालयाने कडक भूमिका घेत प्राध्यापकाला सेवेतून कमी करण्याचा निर्णय हा पूर्णपणे व्यवस्थापनाचा असल्याचे स्पष्ट केले आहे.



























































