
लोकसभेत राहुल गांधी यांनी वापरलेल्या ‘इडियट’ शब्दावरून गोंधळ घालणाऱ्या सत्ताधारी भाजपचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार समाचार घेतला. ‘इडियट हा शब्द तुम्हाला इतका का झोंबला,’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डिंपल पब्लिकेशन्सच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. असंसदीय शब्द वापरल्याचा कांगावा करून सत्ताधाऱ्यांनी आज राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखले. त्यावर यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ‘हेच भाजपवाले डिलिमिटेशनचे बिल आणण्यासाठी इतर पक्षांचे खासदार पह्डताहेत. संसदेतील सदस्य संख्या वाढवायची आहे. पण वाढलेल्या खासदारांना बोलायला मिळणार का? साडेपाचशे लोकांना बोलायला वेळ दिला जात नाही तर साडेआठशे खासदारांना काय देणार?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ‘खासदार वाढवण्यापेक्षा युवकांच्या रोजगाराच्या संधी वाढवा. रस्त्यावर उतरलेल्या तरुणांचे समाधान होईल असे विधेयक आणा,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी सरकारला हाणला.
आम्ही न्यायासाठी चार-चार वर्षे लटकत आहोत. उद्या पुन्हा तारीख आहे. उद्या 30 तारीख आहे. आज 29 आहे. पुन्हा पुढची 29 जुलै ही तारीख न मिळो ही देवाकडे प्रार्थना आहे, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला. मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणाऱ्या तरुणीला अंधभक्त ट्रोल करत आहेत. त्यांनाही उद्धव ठाकरे यांनी झोडपून काढले. लायकी आहे का तुमची या देशात राहण्याची, असा संताप त्यांनी व्यक्त केला. आज युवक म्हणताहेत, हम लेके रहेंगे, आझादी…. भूकमरीसे आझादी… कारण आजचे स्वातंत्र्य त्यांना अपेक्षित नव्हते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ही झुरळेच उद्या सत्ताधाऱ्यांचा कोथळा काढतील!
छत्रपती शिवाजी महाराजांना ‘पहाड का चुहा’ म्हणणारा अफझलखान आणि आजच्या तरुणांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये फरक काय, असा सवाल करतानाच, ‘महाराजांनी जसा अफझलखानाचा कोथळा काढला होता, तसा या झुरळांनी आताच्या सत्ताधाऱ्यांचा कोथळा काढला तर दोष कुणाला देणार? आता मने पेटली आहेत. त्याला सत्ताधारीच जबाबदार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
युवाशक्तीकडे दुर्लक्ष केले तर काय होते हे विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून दिसले. या युवकांचा शिवसेनेला अभिमान आहे. लोकशाहीने मान टाकली असे वाटले होते, पण युवांनी दाखवले की लोकशाहीने कात टाकलीय. ती पुन्हा ताजीतवानी झाली आहे.

























































