
नीट पेपरफुटी विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्वप्रथम मोदींनी आणि अमित शहांनी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करत जंतरमंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर भाष्य केले. जंतरमंतरवर ज्यांनी मला शिव्या दिल्या त्यांना माफ करतो, असे पंतप्रधान मोदी व्हिडिओत म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांवर ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदींनी आणि अमित शहांनी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. याचं कारण ज्या पद्धतीने काठीला खिळे लावून विद्यार्थ्यांना मारण्यात आलं, त्यांच्यावर छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला. एवढच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पुरुष पोलिसांकडून त्यांचे कपडे फाडले गेले. म्हणजे ऐकल्यावर सुद्धा अंगावरती शहारे येत होते. पण त्या मुलांनी ते भोगलंय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विद्यार्थ्यांची मागणी काय की, शिक्षण पद्धतीत सुधारा. साधी मागणी होती. जे तुम्ही आता करताय ते तुम्ही पहिल्या दिवशी त्यांच्याशी बोलून करू शकत होतात. तुम्हाला अतिरेक्यांशी आणि पाकिस्तानशी बोलायला काही वाटत नाही. पण आपल्याच देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्यांना तुम्ही झुरळ म्हणताहेत, त्यांना तुम्ही भरकटलेले म्हणताहेत. काय पुढे देश चालणार कसा? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार सडकून टीका केली.


























































