
दिव्यांगांसाठी राखीव जागांवर अनधिकृतपणे बसणे, अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वे हद्दीत अनधिकृत प्रवेश यांच्याविरोधात मध्य रेल्वेने विशेष मोहीम राबवली. आरपीएफ आणि वाणिज्यिक अधिकारी व निरीक्षकांच्या सहकार्याने 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत विविध तिकीट तपासणी पथकांनी विशेष मोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान एकूण 677 प्रकरणे आढळून आली आणि दंड म्हणून 10.10 लाख रुपये वसूल करण्यात आले. रेल्वे कायद्याच्या चार प्रमुख कलमांतर्गत ही कारवाई करण्यात आली. कलम 155(1) अंतर्गत 321 प्रकरणांत 6,37,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. कलम 155(1) ब अंतर्गत 93 प्रकरणांत 93,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. कलम 144 अंतर्गत 99 प्रकरणांत 1,98,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. कलम 147 अंतर्गत 164 प्रकरणांत 82,000 रुपये दंड वसूल करण्यात आला.
मानखुर्द येथे सर्वाधिक 289 प्रकरणे नोंदवून 4,49,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर वडाळा रोड येथे 232 प्रकरणे नोंदवत 2,57,000 रुपये दंड, तसेच ठाणे स्थानकावर 61 प्रकरणांत 1,22,000 रुपये दंडाची कारवाई झाली. कारवाई करण्यात आलेल्या इतर प्रमुख स्थानकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, घाटकोपर, पनवेल, मस्जिद, चिंचपोकळी, चेंबूर, सानपाडा, शिवडी, वाशी आणि लोणावळा यांचा समावेश आहे.


























































