
ट्रेकिंग करताना धबधब्यात पडून जखमी झाल्याने मुंबईतील पर्यटक तरुणाचा शहापूरमध्ये मृत्यू झाला. शहापूर तालुक्यातील डेहणे येथे रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सोनू सिंग (30) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून तो मुंबईतील पवई येथील रहिवाशी होता. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, डेहणे येथील करवली धबधबा परिसरात रविवारी घाटकोपर, पवई येथील सुमारे 25 तरुण ट्रेकिंगसाठी आले होते. ट्रेकिंग करताना सोनू सिंग अचानक खाली धबधब्यात पडला. पाण्यातील टोकदार दगडावर आदळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तातडीने पाण्यात उतरून त्याला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.


























































