पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये शांतता मार्च दरम्यान स्फोट, 7 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात रविवारी भीषण दुर्घटना घडली. स्वात जिल्ह्यातील काबल टाऊनमध्ये एका शांतता रॅलीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत 18 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा स्फोट आत्मघाती हल्ला असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले जात आहे. तथापि स्फोटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, स्वात अमन जिरगा या स्थानिक आदिवासी परिषदेने शांततेची मागणी करत ही रॅली आयोजित केली होती. मार्चमध्ये सहभागी नागरिकांनी हातात फलक धरत घोषणाबाजी केली आणि शांततेचे आवाहन केले. यादरम्यान अचानक शक्तिशाली स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. स्फोटानंतर परिसरात घबराट पसरली.

स्फोटाची माहिती मिळताच, जिल्हा प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. स्फोटात अनेक जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्वात पोलिसांनी वर्तवली आहे. प्रशासनाने परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहेत.