३९ पदकांचं वजन ६१ पेक्षा जड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<मंगेश वरवडेकर>>

गतवर्षीच्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानने ६१ पदके जिंकली होती. २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. वरवर पाहता हा आकडा २०२६ च्या ग्लासगोतील ३९ पदकपिक्षा खूप मोठा वाटतो, पण खेळाच्या मैदानात पदक तालिका असो किंवा स्कोअरबोर्ड, नेहमी संपूर्ण सत्य सांगत नाही. कधी कधी १८० धावांचा पाठलाग करताना केलेलं शतक हे ३०० धावांच्या सपाट खेळपट्टीवरील शतकापेक्षाही मोठं असतं. तसेच ग्लासगोमध्ये हिंदुस्थानने नेमकं तेच करून दाखवलंय. बर्मिंगहॅमच्या ६१ पदकांपेक्षा ग्लासगोच्या ३९ पदकांचे वजन आणि चकाकी थोडी जास्त आहे.

२०२२ मध्ये हिंदुस्थानच्या पदकांचा अर्धा कणा असलेले खेळच यंदा स्पर्धेतच नव्हते. कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, स्क्वॉश… अशा नऊ खेळांना आयोजकांनी लाल कार्ड दाखवलं. या वगळलेल्या खेळांतूनच हिंदुस्थानने बर्मिंगहॅममध्ये २८ पदकं जिंकली होती. त्यात १३ सुवर्ण पदकांसह तब्बल २५ पदकं फक्त कुस्ती, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या तीन खेळांनी दिली होती. म्हणजे एखाद्या संघाचा विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा यांनाच ड्रेसिंगरूममध्ये बसवून सामना खेळायला लावण्यासारखी ही परिस्थिती होती.

 

ग्लासगोत परिस्थिती काही विचित्र होती, मात्र हिंदुस्थानने सबब सांगितली नाही. उत्तर दिलं. २०२२ मध्ये २१० खेळाडूंचे पथक उतरले होते. यंदा अवघे १२२ खेळाडू ग्लासगोला गेले. सैन्य अर्धं, रणांगण लहान, पण हल्ल्याची धार तशीच. १३ सुवर्णांसह ३९ पदकं जिंकत हिंदुस्थानने पुन्हा चौथं स्थान कायम ठेवलं. हे पदकांचं गणित नाही, तर जिद्दीचं बीजगणित आहे.

 

या स्पर्धेचा सर्वात दमदार पंच मारला तो हिंदुस्थानी महिलांनी. पथकात ७६ पुरुष आणि फक्त ४६ महिला. पण सुवर्णपदकांच्या रंगमंचावर त्यांनी पुरुषांना अक्षरशः मागे टाकलं. १३ पैकी तब्बल ८ सुवर्ण महिलांनी जिंकली.क्रिकेटमध्ये म्हणतात, ‘बिग मॅच प्लेअर’ हिंदुस्थानच्या महिला आता बिग मॅच प्लेअर झाल्या आहेत. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये तर त्यांनी प्रतिस्पर्ध्याच्या आशांनाच नॉकआऊट केलं. प्रीती पवार, जास्मिन लंबोरिया, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि प्रिया घंघास या पाच सुवर्णकन्यांनी असा गोल्डन पंच मारला की राष्ट्रकुलच्या इतिहासात त्याचा आवाज बराच काळ घुमत राहील. बॉक्सिंगची रिंग त्या दिवशी हिंदुस्थानच्या मुलीची मालमत्ता झाली होती.

 

बॉविंसगने हिंदुस्थानच्या झोळीत ७सुवर्ण टाकली. त्यापैकी पाच या कन्यांनी जिंकली. एकूण दहा पदके हिंदुस्थाननी जिकली. निम्मी महिलांची होती. ज्युडोच्या मॅटवरही अस्मिता डेने प्रतिस्पर्ध्याला बाहेर फेकले, वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाईने लोखंडाबरोबर अपेक्षांचं तिसऱ्यांदा सुवर्ण ओझं उचललं. त्यामुळे हिंदुस्थान आता एका-दोन खेळांवर अवलंबून राहिलेला देश नाही. पदकांची शेती आता अनेक मैदानांवर फुलू लागली आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. फक्त प्रश्न इतकाच आहे की, राष्ट्रकुलची ही कामगिरी ऑलिम्पिकच्या रणांगणात किती टिकते याकडे लक्ष असेल.

 

या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पुन्हा नंबर वनचा मुकुट टिकवला. पण इंग्लंडचं काय? घरच्या स्पर्धेत चमकणारा संघ यावेळी तब्बल ३१ सुवर्णांनी खाली आला. कॅनडाच्याही पदकांची पिशावी हलकी झाली. म्हणजे खेळ कमी झाल्याचा फटका फक्त हिंदुस्थानलाच बसला असं नाही. बलाढ्य संघांच्याही छातीत त्याचा धक्का बसला. तरीही हिंदुस्थानने चौधं स्थान सोडलं नाही. म्हणूनच २०२६ च्या ३९ पदकांकडे फक्त आकडा म्हणून पाहू नका. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात तुटक्या खेळपट्टीवर काढलेलं शतक जसे अमूल्य असतं, तशी ही कामगिरी आहे. आयोजकांनी खेळ काढले, पण हिंदुस्थानच्या खेळाडूंनी हिंमत काढू दिली नाही. पदकं कमी असतील, पण या ३९ पदकांचं वजन २०२२ च्या ६१ पदकांपेक्षाही जड आहे. कारण ही पदकं परिस्थितीला हरवून जिंकलेली आहेत.