
एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाच्या वापराबाबत कडक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार वाहन, बसस्थानक, आगार परिसरात ‘खाकी’ गणवेशाचा वापर करून आक्षेपार्ह, अश्लील, दुहेरी अर्थाची गाणी असलेली रिल्स आणि व्हिडीओ बनवण्यास सक्त मनाई केली आहे. आक्षेपार्ह रिल्स प्रसारित करणाऱ्यांवर थेट निलंबनासारखी कठोर कारवाई केली जाणार आहे. याबाबत मुंबई विभागातील सर्व आगारांना सूचना दिल्या आहेत.
राज्य सरकारने गेल्यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्याला अनुसरून एसटी महामंडळाने नवी कठोर नियमावली जारी केली आहे. मुंबई विभागातील विविध आगार आणि संबंधित घटकांतील काही कर्मचाऱ्यांकडून वर्दीचा वापर करून आक्षेपार्ह, भडकावू, मानहानीकारक, भेदभाव निर्माण करणारे फोटो, रिल्स, व्हिडीओ प्रसारित करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा गैरसमज होऊन एसटी महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होत असल्याचे विभाग नियंत्रकांनी नुकत्याच जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
याच अनुषंगाने एसटीच्या बसेस, बसस्थानकात किंवा महामंडळाच्या परिसरात खाकी गणवेशात आक्षेपार्ह गाण्यांवर रिल्स किंवा व्हिडीओ बनवून सोशल मीडियात प्रसारित करण्यास सक्त मनाई केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आक्षेपार्ह रिल्स आणि व्हिडीओ आढळल्यास संबंधितांवर महामंडळाच्या प्रचलित शिस्त व आवेदन कार्यपद्धतीअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभाग नियंत्रकांनी पत्राद्वारे दिला आहे.
मुंबई सेंट्रल, परळसह इतर आगारांना निर्देश
कडक नियमावली सर्व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल, कुर्ला नेहरू नगर आणि उरण या आगारांच्या आगार व्यवस्थापक व घटक प्रमुखांना दिले आहेत. नियमावलीचे पत्र आगारांतील सूचना फलकांवर तात्काळ लावा, सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या परिपत्रकावर स्वाक्षऱ्या घेऊन तसा अहवाल दप्तरी जतन करा, असे आदेश आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.
पनवेल आगारातील तिघांचे निलंबन
पनवेल आगारातील नंदा कोळी या महिला कर्मचाऱ्याने दुहेरी अर्थाच्या गाण्यावर रिल्स बनवले. नंदा कोळी या कंडक्टर असून त्यांच्या रिल्समध्ये अन्य दोघा कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तो व्हिडीओ सोशल मीडियात प्रसारित झाल्यामुळे महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली, असा ठपका ठेवत तिघांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले. यात पनवेल आगाराचे वाहतूक नियंत्रक विजयकुमार माने आणि सुनील देशमुख यांचा समावेश आहे.































































