
बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान सध्या त्याच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमानचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये तो पूर्वीपेक्षा बऱ्यापैकी सडपातळ दिसत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र, आता सलमानने स्वतःच त्याच्या वजन कमी करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, नुकत्याच एका रिॲलिटी शोमध्ये सलमान त्याचा भाऊ सोहेल खान याला भेटण्यासाठी पोहोचला होता. यावेळी दोन्ही भावांमध्ये फिटनेस आणि वजन कमी करण्याबाबत चर्चा झाली. सोहेलने आपले सिक्स-पॅक ॲब्स दाखवत तब्बल 12 किलो वजन कमी केल्याचे सांगितले. त्यानंतर सलमाननेही आपण 16 किलो वजन कमी केल्याचे सांगितले. सलमानच्या या वक्तव्यानंतर त्याच्या अचानक बदललेल्या लूकमागे कोणताही गंभीर आजार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्याने हे वजन आरोग्याच्या समस्येमुळे नव्हे, तर आपल्या आगामी चित्रपटासाठी कमी केल्याचे स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांत सलमानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. विशेषतः मुंबईतील एसआरए कार्यालयाच्या उद्घाटनावेळी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सलमान पूर्वीपेक्षा अधिक सडपातळ दिसत होता. त्याचा बदललेला लूक पाहून चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, सलमानने स्वतः वजन कमी केल्याची माहिती दिल्याने या चर्चांना आता वेगळे वळण मिळाले आहे.
सलमानने 16 किलो वजन कमी करण्यामागील चित्रपटाचे नाव स्पष्टपणे सांगितलेले नसले तरी, तो सध्या आगामी ॲक्शन चित्रपट ‘SVC63’ च्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटात मोठ्या प्रमाणावर ॲक्शन सीक्वेन्स असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भूमिकेला साजेसा लूक आणि फिटनेस मिळवण्यासाठी सलमानने वजन कमी केल्याचे मानले जात आहे.































































