
बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हा बिहारच्या जनतेने भाजप आणि एनडीए नेतृत्वाला राज्यातील नेतृत्व बदलण्यासाठी दिलेला स्पष्ट संदेश आहे, असे वक्तव्य जन सुराजचे संस्थापक आणि नवनिर्वाचित आमदार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी केले. येथील मतदारांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची वर्तणूक, चारित्र्य आणि चेहरा पूर्णपणे नाकारला असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.
बांकीपूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रशांत किशोर यांनी बिहारमधील भाजपच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “बांकीपूरचा निकाल ही सरकार बदलण्याची मागणी नसून, भाजपच्या विद्यमान नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेली नाराजी आहे. बिहारच्या जनतेने भाजप आणि एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांना एक स्पष्ट संदेश दिला आहे की, राज्याला एक चांगला मुख्यमंत्री द्या आणि सत्तेत येताना जी आश्वासने दिली होती, त्यावर लक्ष केंद्रित करा.”
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर थेट हल्लाबोल करताना किशोर म्हणाले की, “ज्या जंगलराज विरुद्ध भाजपने नेहमी प्रचार केला, आज त्याच राजकारणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याला त्यांनी सत्तेवर बसवले आहे. ज्या जंगलराज विरोधात तुम्ही मते मागितली, त्याच जंगलराजचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही भगवी शाल पांघरून खुर्चीवर बसवले, तर जनता ते कदापि स्वीकारणार नाही. याच कारणामुळे लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले.”




























































