
ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांचा पाऊस पाडून हिंदुस्थानचा झेंडा उंचावणाऱया खेळाडूंचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, तिरंग्याचा दिमाख आणि पुष्पवृष्टीत खेळाडूंचे स्वागत झाले. राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण (साई), हिंदुस्थान ऑलिम्पिक संघ, विविध क्रीडा महासंघांचे पदाधिकारी, प्रशिक्षक, कुटुंबीय आणि शेकडो चाहत्यांनी या विजेत्यांवर काैतुकाचा वर्षाव केला.
राष्ट्रपुल स्पर्धेत हिंदुस्थानच्या 14 बॉक्सर्संपैकी 10 जणांनी पदके जिंकत 7 सुवर्ण आणि 3 रौप्यपदकांची कमाई केली. हा हिंदुस्थानच्या राष्ट्रकुल इतिहासातील सर्वोत्तम बॉक्सिंग कामगिरीचा नवा विक्रम ठरला.
महिला 51 किलो गटातील सुवर्णपदक विजेती साक्षी चौधरी म्हणाली, ‘हे स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. देशाने केलेले स्वागत अविस्मरणीय आहे. आता आमचे संपूर्ण लक्ष आशियाई क्रीडा स्पर्धेकडे असून, तिथेही हिंदुस्थानसाठी सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार आहे.’
सुवर्णपदक विजेती प्रिया घंघास हिने ही कामगिरी कारकिर्दीतील सर्वोत्तम असल्याचे सांगत आशियाई स्पर्धेतही सुवर्णपदकाचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट केले. जैस्मिन लांबोरियाने कुटुंबीय आणि प्रशिक्षकांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आगामी स्पर्धांमध्येही पदके जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. रौप्यपदक विजेता नरेंद्र बेरवाल म्हणाला की, सुवर्ण हुकल्याची खंत असली तरी, आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तो सज्ज आहे.
ज्युदोमध्ये हिंदुस्थानने प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकत इतिहास रचला. सुवर्णपदक विजेती अस्मिता डे म्हणाली, ‘ही ऐतिहासिक कामगिरी देशात ज्युदोला नवी ओळख देईल. आता अधिकाधिक मुले या खेळाकडे वळतील, अशी आशा आहे.’
पॅरा क्रीडा प्रकारातील पदक विजेता सोमन राणा म्हणाला की, हे यश संपूर्ण देश, हिंदुस्थानी सैन्य आणि आपल्या राज्याचे आहे. आता आशियाई स्पर्धा आणि पॅरालिम्पिकमध्येही दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे. पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या मोहम्मद बासिलने या अनुभवातून बरेच काही शिकायला मिळाल्याचे सांगत भविष्यात आणखी मोठय़ा यशाचा विश्वास व्यक्त केला.





























































