
अयोध्येतील राम मंदिर लुटीच्या मुद्दय़ावरून संसदेत आज पुन्हा राडा झाला. इंडिया आघाडीच्या खासदारांनी लोकसभा व राज्यसभेत सरकारला घेरले. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याकडून उत्तराचा आग्रह धरला. लपू नका, सभागृहात या… उत्तर द्या! अशा घोषणा घुमल्या. गदारोळामुळे संसद ठप्प झाली.
संसद अधिवेशनाचा आज बारावा दिवस होता. लोकसभेचे कामकाज आज फक्त 19 मिनिटे चालले. कामकाज सुरू होताच विरोधकांनी मंदिर लुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे गदारोळ झाला. त्या गोंधळात केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी कर सुधारणांशी संबंधित विधेयके सादर केली. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले.
विरोधकांनी संसदेचे प्रांगणही दणाणून सोडले. संसदेच्या आवारात दानपेटी ठेवून व त्यात प्रतिकात्मक देणगी टाकून सर्वपक्षीय सदस्यांनी निदर्शने केली. ‘अमित शहा उत्तर द्या… चंदा चोर, गद्दी छोड… श्रद्धा का करती व्यापार, नही चलेगी चोर सरकार…’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. प्रियांका गांधीही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
आता ईडी, सीबीआय कुठे आहेत?
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिरातील देणगी लुटीचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर हल्ला चढवला. ‘‘रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट सरकारने स्थापन केला. या ट्रस्टला 70 एकर जमीनही देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिराच्या भूमिपूजनापासून ते प्राणप्रतिष्ठेपर्यंत प्रत्येक सोहळ्यात स्वतः उपस्थित राहिले होते. मात्र घोटाळा झाल्यापासून ते गप्प आहेत. अशा प्रकारे ते जबाबदारीपासून पळू शकत नाहीत. आता ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्ससह इतर तपास यंत्रणा कुठे गायब आहेत? पंतप्रधानांनी याचे उत्तर द्यायला हवे. प्रभू रामचंद्रांच्या नावाने चोरी करणाऱयांनी देशाची माफी मागितली पाहिजे,’’ अशी जोरदार मागणी खरगे यांनी केली. त्यांच्या वक्तव्यामुळे जोरदार गदारोळ झाला.
दोन्ही सभागृहांत राम मंदिरावर चर्चा झाली पाहिजे. अध्यक्षांनी तशी परवानगी द्यावी. सभागृह चालावं अशी आमचीही इच्छा आहे. पण त्यासाठी मोदी आणि शहांनी सभागृहात आलं पाहिजे. तो एकच मार्ग आता उरला आहे. – मल्लिकार्जुन खरगे
आभाळ कोसळलेलं नाही – सतीश महाना
उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी आज पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. ‘असं काही आभाळ कोसळलेले नाही. कसलीही चोरी वगैरे झालेली नाही’, असे महाना म्हणाले. ‘तुमच्यापैकी किती लोकांनी देणग्या दिल्या होत्या. पावत्या घेऊन या मग कळेल, कोणाचे किती पैसे चोरीला गेले ते, अशा शब्दांत त्यांनी विधानसभेत विरोधकांना दरडावले.




























































