जम्मूहून अमरनाथ यात्रेला तात्पुरती स्थगिती; यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी कडेकोट सुरक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amarnath-yatra-suspended-from-jammu-article-370-abrogation-anniversary-security-alert

कलम ३७० रद्द करण्याच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याने बुधवारी जम्मू येथील छावणीतून सुरू होणारी अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली.

जम्मूतील भगवती नगर तळ छावणीतून आजच्या दिवसापुरती अमरनाथ यात्रा स्थगित करण्यामागचे कोणतेही विशिष्ट कारण प्रशासनाने दिले नसले, तरी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

आज सकाळी जम्मू येथील तळ छावणीतून अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम आणि गांदरबल जिल्ह्यातील बालटाल या दोन्ही तळ छावण्यांकडे जाण्यासाठी यात्रेकरूंची कोणतीही नवी तुकडी रवाना करण्यात आली नाही, असेही त्यांनी सांगितल्यांचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

सूत्रांनी सांगितले की, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा दलांच्या ताफ्यांची वाहतूकही तात्पुरती थांबवण्यात आली आहे. कश्मीरला देशाच्या इतर भागांशी जोडणारा हा सर्व हवामानात सुरू राहणारा एकमेव महत्त्वाचा रस्ता असून, सुरक्षा यंत्रणांना या धोरणात्मक मार्गावरील हालचाल कमी करायची असते, तेव्हा अशा प्रकारचा उपाय सामान्यतः केला जातो.

दरम्यान, सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी ५ ऑगस्ट हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळला. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने तत्कालीन जम्मू-कश्मीर राज्याला कलम ३७० अंतर्गत असलेला विशेष दर्जा रद्द करून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये निर्माण केले होते. त्या निर्णयाच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त याचे आयोजन करण्यात आले होते.

जम्मू-कश्मीरला पुन्हा विशेष घटनात्मक दर्जा आणि पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी या तिन्ही पक्षांनी जम्मूसह विविध ठिकाणी स्वतंत्र आंदोलनांची घोषणा केली होती.

देशातील सर्वात मोठ्या वार्षिक धार्मिक यात्रांपैकी एक असलेल्या अमरनाथ यात्रेसाठी बहुस्तरीय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येते. सुरक्षा परिस्थितीचा आढावा आणि गुप्तचर यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार प्रशासन वेळोवेळी यात्रेच्या हालचालींच्या आराखड्याचा फेरआढावा घेत असते.

यंदा आतापर्यंत ३,८८० मीटर उंचीवर दक्षिण हिमालयात असलेल्या पवित्र अमरनाथ गुहेत ४ लाख ६० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे.

यंदाची अमरनाथ यात्रा ३ जुलै रोजी सुरू झाली असून, रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी तिची सांगता होणार आहे.