
‘उटीत जुगार सुरू आहे…’ असा फोन ११२ नंबरवर आला आणि पोलीस यंत्रणा कामाला लागली. उटी गाव हे अतिदुर्गम व संवेदनशील भाग त्यामुळे पोलिसांनीही प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे सहकाऱ्यांसह साध्या वेशात, पोलीसांची गाडी बाजूला ठेवून खासगी वाहनाने उटीकडे रवाना झाले. मात्र, अख्खे गाव पालथे घातल्यानंतरही जुगाराचा डाव काही सापडलाच नाही! अखेर फोन करणाऱ्यानेच पोलिसांना चांगलीच ‘गावाची सैर’ घडवून आणल्याचे समोर आले.
महागाव तालुक्यातील उटी येथील अनिल साहेबराव वानखेडे (४०) याने आपल्या मोबाईलवरून ११२ नंबर वर फोन करून गावात जुगार सुरू असल्याची माहिती दिली. ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार संदीप तळांडे यांनी ही माहिती महागाव पोलिसांना दिल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
उटी हे गाव संवेदनशील म्हणून ओळखले जाते. गाव अत्यंत अंतर्गत भागात असून तेथे जाण्यासाठी धड रस्ताही नाही . यापूर्वी याच गावात एका घरावर धाडसी दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलीसांनी ११२ वरील या कॉलकडे गांभीर्याने पाहिले.
‘जुगाराचा डाव’ शोधण्यासाठी पोलिसांची खास मोहीम!
पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेत साध्या वेशात खासगी वाहानाने उटी गाठले. पोलिसांची गाडी न वापरता अधिकारी गावात पोहोचल्याने कारवाईला अधिक गुप्तता मिळेल, अशी खबरदारी घेण्यात आली. मात्र, फोन करणाऱ्या अनिल वानखेडेने पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले. पोलिसांनी संपूर्ण गाव पालथे घातले; मात्र ना जुगाराचा अड्डा सापडला, ना जुगाऱ्यांचा डाव!
चौकशीदरम्यान संबंधित व्यक्ती दारूच्या अमलाखाली असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांकडेही चौकशी केली असता गावात जुगार सुरू असल्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे ११२ वर दिलेली माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांची दिशाभूल करून आपत्कालीन सेवेचा गैरवापर केल्याप्रकरणी महागाव पोलिसांनी कायदयाच्या तरतुदीनुसार अनिल साहेबराव वानखेडे याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा क्रमांक ५७/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९२ अन्वये नोंद केली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून पुढील अनिलवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी दिली.
‘११२’वर फोन म्हणजे गंमत नाही!
११२ ही आपत्कालीन सेवा असून नागरिकांनी तिचा वापर केवळ खऱ्या आणि तातडीच्या प्रसंगासाठीच करावा. खोटी माहिती देऊन पोलिसांचा वेळ, मनुष्यबळ आणि संसाधने वाया घालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी दिला आहे.

























































