आंदोलनकर्त्या महिलांच्या घरी गुंड पाठवून माफी मागायला लावली; राहुल गांधी यांचा थेट हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेवरील मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांकडून झालेल्या अमानुष कारवाईवरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी याप्रकरणी थेट गृह मंत्रालयाला जबाबदार धरले आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनात राहुल गांधी यांनी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुंबईतील आंदोलक रिया अहीरसह इतर आंदोलक तरुण उपस्थित होते.

विविध राज्यांतून आलेल्या तरुण आंदोलकांसोबत राहुल गांधी यांनी चर्चा केली. आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार न करता अत्यंत शांततेत आपला हक्क मागणाऱ्या हजारो आंदोलकांचे त्यांनी अभिनंदन केले. आंदोलकांना धमकावले गेले, त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला. आपण सर्व आंदोलकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे तुम्हाला कोणाचीही माफी मागण्याची गरज नाही. मला तुमच्या सर्वांचा अभिमान आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी तरुणांचा उत्साह वाढवला.

हे सर्व तरुण शांततेच्या मार्गाने लढत असतानाही त्यांच्यावर लाठ्या उगारल्या गेल्या आणि त्यांच्यावर अन्याय झाला. जेव्हा-जेव्हा देशातील कोणत्याही नागरिकावर अन्याय होतो, तेव्हा त्याची रक्षा करणे हे आपले नागरिक म्हणून कर्तव्य आहे. एका १५ वर्षांच्या मुलीच्या घरी गुंड पाठवून तिला माफी मागायला लावणे हा अत्यंत चुकीचा प्रकार असल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले.

देशातील तरुण अत्यंत हिमतीने सत्य समोर मांडत आहेत, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीकास्त्र सोडले. अशा प्रकारे प्रसारमाध्यमांसमोर येऊन जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमत पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांमध्ये नाही, असा टोला राहुल गांधी यांनी यावेळी लगावला.