
राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बनावट पनीरवर कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्यात 5 ऑगस्टपासून ॲनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी लागू केल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बुधवारी पत्रकार घेतली. यावेळी नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणार नाही, केवळ दुधाच्या पनीर उत्पादनाला परवानगी असेल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. ॲनालॉग पनीरवर बंदी आणणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असू शकेल, असेही तुकाराम मुंढे पुढे म्हणाले.
कोणालाही व्हीआयपी ट्रिटमेंट दिली नाही. जिथे नागरिकांच्या जीवाला धोका होता तिथेच फक्त परवाना जप्तीची कारवाई झाली. ज्या 80 टक्के आस्थापना योग्य स्थितीत होत्या, त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. विशेष तपासणी मोहिम राबवून संशयित उत्पादनांचे नमुने घेऊन पुढील कारवाईचे निर्देश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच पनीरच्या पॅकिंगवरील सर्व नॉर्म पाळले गेले पाहिजेत. संशय आल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना केले आहे.
कायदेशीररित्या आम्ही बरोबर आहेत. जो कारवाईशी संतुष्ट नसेल त्याने माझ्याकडे अपील करायला हवी हेच कायदा सांगतो. 165 पैकी 103 अपील केले आहेत. त्यांच्याकडे उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, असेही मुंढे यांनी नमूद केले.






























































