बनावट सातबाराच्या आधारे दस्त नोंदणी; सहदुय्यम निबंधकांची 9 जणांना नोटीस, पुराव्यासह हजर राहण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत तालुक्यातील मौजे वालवड येथील गट क्रमांक 126 मधील वादग्रस्त जमीन व्यवहाराला नवे वळण मिळाले आहे. बनावट 7/12 उताऱयाच्या आधारे खरेदीखताची नोंदणी झाल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर सहदुय्यम निबंधकांनी 9 जणांना नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे महसूल आणि नोंदणी विभागात खळबळ उडाली आहे.

साहेबराव अहिलाजी पांडुळे, प्रदीप झुंबर काळे (दोघेही रा. वालवड, ता. कर्जत), लक्ष्मण दामोदर कुटे, मंगेश दामोदर ऊर्फ दामू कुटे (दोघेही रा. आव्हाळवाडी, वाघोली, पुणे), छाया दशरथ रुके, रुपेश दशरथ रुके (दोघेही रा. गणेगाव खा, ता. शिरूर, पुणे), झुंबर मुक्ताजी वाघमोडे (रा. रेहेकरी, ता. कर्जत), बाळासाहेब आबा गलांडे (रा. गलांडवाडी, कोरेगाव, ता. कर्जत), मच्छिंद्र चांगदेव हाके (रा. कर्जत) या 9 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या सर्वांना 7 ऑगस्ट रोजी पुराव्यासह समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

वालवड येथील गट क्रमांक 126, क्षेत्र 3 हेक्टर 58 आर या जमिनीचे खरेदीखत नोंदणीसाठी सादर करण्यात आले होते. मात्र, या व्यवहारासोबत सादर करण्यात आलेला 7/12 उतारा बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित व्यवहाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वीच संबंधित जमीन व्यवहाराबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यानंतर आता नोंदणी विभागाने स्वतः नोटीस काढल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. नोटिशीत नमूद करण्यात आलेल्या सर्व संबंधितांना 7 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सहदुय्यम निबंधक कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. यातील कोणी गैरहजर राहिल्यास त्यांना कोणतेही म्हणणे मांडायचे नाही, असे गृहीत धरून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.