बेपत्ता तीन अल्पवयीन मुलांचा 24 तासांत शोध, वाई पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अल्पवयीन मुलांना पळवून नेल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुह्यात वाई गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या 24 तासांत कामगिरी करत तीनही मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या सुपूर्द केले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

1 ऑगस्ट रोजी वाई पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुले पळवून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी तत्काळ सूत्रे हलवत गुन्हे प्रकटीकरण पथकाची तीन स्वतंत्र पथके तयार केली.

तपासादरम्यान वाई, मांढरदेवी आणि पाचगणी परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान पहिल्या पथकातील कॉन्स्टेबल धोत्रे यांना वाई एमआयडीसी चांदणी चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही तीन मुले फिरताना दिसून आली. बोपर्डी, धावडी, लोहारे, सुलतानपूर व शेलारवाडी परिसरात नागरिकांना मुलांचे फोटो दाखवून शोध घेण्यात आला. यावेळी तीन मुले आयटीआय कॉलेज परिसरातील डोंगराच्या बाजूला पळताना निदर्शनास आली. पोलीस पथकाने सापळा रचून शोध घेतला असता, डोंगराच्या पलीकडील बाजूस तिन्ही मुले सुखरूप आढळली. चौकशी केली असता, ही मुले एकमेकांचे मित्र असून, सायकलवरून फिरत निघून आल्याचे समोर आले. पोलिसांनी सर्व मुलांचे योग्य समुपदेशन करून त्यांना पालकांच्या यशस्वीरीत्या ताब्यात दिले.

पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, उपनिरीक्षक अमित सुर्वे, नितीन कदम, विक्रम धोत्रे, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, विशाल येवले इंद्रजित लाखे यांच्या पथकाने कारवाई केली.