Mumbai News – विक्रोळीत मोठ्या आवाजात गाणी लावल्यावरून कुटुंबात राडा, चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या कारणातून कुटुंबात झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. यावेळी चाकू हल्ल्यात कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात गुरुवारी पहाटे ही घटना घडली. सुनील विश्वकर्मा (40) आणि श्लोक विश्वकर्मा (14) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटेच्या सुमारास विश्वकर्मा कुटुंबात मोठ्या आवाजात गाणी लावल्यावरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन कुटुंबातील सदस्यांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान कुटुंबातील सदस्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत चाकूने वार केले. यात सुनील विश्वकर्मा आणि श्लोक विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि धाकटा मुलगा विवान विश्वकर्मा यांनाही चाकूच्या हल्ल्यात दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.