गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन निवेदन द्यावे; मल्लिकार्जुन खरगे मागणीवर ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्यावरून संसदेत गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केल्याने राजकारण अधिक तापले आहे. विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची कोंडी झाली. यावेळी आंदोलकांवर केलेल्या पोलीस कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावे, अशी मागणी खरगे यांनी केली. तसेच या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विरोधक पूर्णपणे तयार असल्याचेही खरगे म्हणाले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधानांनी आधी विद्यार्थ्यांची माफी मागावी. तसेच पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीहल्ल्याबाबत सभागृहात येऊन निवेदन द्यावे, तरच देशातील लोकांपर्यंत संदेश पोहोचू शकेल, हीच आमची इच्छा असल्याचे खरगे यांनी म्हटले.

सभागृहात आमच्या खासदारांनी राज्यसभेच्या अध्यक्षांशी चर्चा करून आपली मते मांडली. यानंतर अमित शाह यांनी या विषयावर निवेदन द्यावे, असे अध्यक्षांनीही सभागृहात सांगितले. मात्र, अध्यक्षांनी बोलताना मध्येच थांबवण्यात आल्याचा आरोप खरगे यांनी केला. जेव्हा-जेव्हा मी सभागृहात बोलायला उभा राहतो, तेव्हा सत्ताधारी पक्षाचे खासदार उभे राहून गोंधळ घालतात. सत्ताधाऱ्यांना जो आदर मिळतो तोच आदर विरोधी पक्षातील खासदार बोलताना दिला पाहिजे. जर सभागृहाच्या कामकाजात अडथळा येत असेल तर, त्यासाठी सरकारच जबाबदार असल्याचे मल्लिकार्जून खरगे म्हणाले.

सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे हीच आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी आधी अमित शहांनी सभागृहात येऊन निवेदन द्यावे, अशी मागणी खरगे यांनी केली.

अमित शहा सभागृहात या! विरोधकांनी सरकारला घेरले; लोकसभेतील कोंडी कायम, कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब