
आजच्या काळात डोकेदुखी ही एक अतिशय सामान्य समस्या बनली आहे. तणाव, अपुरी झोप, शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन), दीर्घकाळ स्क्रीन पाहणे अशा विविध कारणांमुळे डोकेदुखी होऊ शकते. डोकेदुखी झाल्यावर अनेक लोक सर्वात आधी एक कप चहा किंवा कॉफी पिणे पसंत करतात. तर काहींच्या मते, चहा-कॉफी प्यायल्याने डोकेदुखी आणखी वाढू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर चहा आणि कॉफीचा प्रभाव वेगवेगळा असतो. त्यामुळे डोकेदुखी झाल्यावर काय उपाय करावे जाणून घ्या….
डोकेदुखीवर चहा किंवा कॉफी प्यावी की नाही?
चहा आणि कॉफीमधील कॅफीन अनेकांना डोकेदुखी किंवा मायग्रेनपासून आराम देण्यास मदत करतात. म्हणूनच डोकेदुखीच्या काही औषधांमध्येही कॅफीन मिसळले जाते. तथापि, त्याचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात. दररोज अतिरिक्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्याने डोकेदुखी वाढू शकते. तसेच, अनेकदा आपण दररोज चहा किंवा कॉफी पितो आणि अचानक ते पूर्णपणे बंद करतो त्यानंतरही कॅफीन सोडल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काय करावे?
- डोकेदुखी सुरू झाल्यावर सर्वात आधी पुरेसे पाणी प्या.
- थोडा वेळ विश्रांती घ्या. जर झोप पूर्ण झाली नसेल तर झोपण्याचा प्रयत्न करा.
- जास्त वेळ मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीची स्क्रीन पाहणे टाळा
- तीव्र प्रकाश किंवा मोठ्या आवाजामुळे त्रास वाढतो, त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा.
- शरीराला जास्त वेळ उपाशी ठेवू नका.
- जर वारंवार किंवा खूप तीव्र डोकेदुखी होत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सतत वेदनाशामक औषधे घेणे टाळा.
डोकेदुखी वारंवार होत असेल, रोज वाढत असेल किंवा औषध घेतल्यानंतरही बरी होत नसेल. तर ही लक्षणे एखाद्या गंभीर आजाराचा संकेत असू शकतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.


























































