एकत्रित आवाज उठवल्यावरच हे सरकार झुकते, राहुल गांधींचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रयागराजमध्ये ८ ऑगस्ट रोजी आयोजित ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमापूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “जेव्हा सर्वांचा आवाज एकत्र उठतो, तेव्हाच हे सरकार झुकते,” असे म्हणत त्यांनी पेपरफुटी आणि रखडलेल्या भरती प्रक्रियेवरून सरकारला लक्ष्य केले. प्रयागराजमधील केपी ग्राउंडवर हा कार्यक्रम पार पडणार असून, प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर आता राहुल गांधी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

X वर केलेल्या एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, ते प्रयागराजला येत आहेत, जे शहर देशभरातील तरुणांच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे प्रमुख केंद्र मानले जाते. इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत आहे की, सिस्टीम आता बेईमान झाली आहे, तुमच्या मेहनतीत कोणतीही कमतरता नाही, तर दोष त्या सिस्टीमच्या हेतूमध्ये आहे, जी तुमच्या कष्टाचे फळ देत नाही, असे ते म्हणाले.

पेपरफुटी, रखडलेली भरती, अनेक वर्षांची प्रतीक्षा आणि कोणालाही जबाबदार न धरणे यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. कोटा, डेहराडून आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांचा दाखला देत, केवळ प्रश्न विचारणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली.