
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला आहे. इस्रायलच्या ‘चॅनल १४’ आणि ‘जेरुसलेम पोस्ट’ने ‘इराणवायर’ या वृत्तसंस्थेच्या आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या प्रशासनातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, इराणच्या प्रशासनामध्ये मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत गंभीर चर्चा सुरू असून, लवकरच त्यांच्या निधनाची बातमी आल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अली खामेनी मारले गेले होते. त्यानंतर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांनी सर्वोच्च नेतेपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी एकदाही ते सार्वजनिक ठिकाणी दिसले नाही. सध्या ते केवळ लेखी निवेदनांद्वारे प्रशासनाशी संवाद साधत आहेत. वडिलांच्या निवासस्थानावर झालेल्या पहिल्या हल्ल्यात मोजतबा खामेनी गंभीर जखमी झाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव ते सध्या अज्ञातवासात असून, संभाव्य हल्ले टाळण्यासाठी केवळ मध्यस्थांच्या माध्यमातून देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवत असल्याचे म्हटले जात आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अलीकडेच एका मुलाखतीत म्हटले होते की, सर्वोच्च नेत्यांशी थेट संवाद साधणे सध्या अत्यंत कठीण झाले आहे. याव्यतिरिक्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही काही काळापूर्वी एका मुलाखतीत इराणचे नेतृत्व ९० टक्के संपल्यात जमा असल्याचा दावा केला होता. इराणच्या आरोग्य मंत्रालयाने आणि अधिकाऱ्यांनी मात्र मोजतबा खामेनी यांच्या दुखापती किरकोळ असल्याचे सांगत यापूर्वीचे दावे फेटाळून लावले होते.





























































