
>>राहुल गोखले
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात अनेक दिग्गज संगीतकार झाले, पण ज्यांच्या संगीतात एक विलक्षण नजाकत, खोल आर्तता आणि गजलेची नखरेल अदा होती, ते म्हणजे मदन मोहन. पत्रकार आणि संगीत विश्वाची सखोल जाण असणारे लेखक अंबरीश मिश्र यांनी लिहिलेले ‘गजलगंधर्व मदन मोहन’ हे पुस्तक (प्रकाशक: राजहंस प्रकाशन) मदन मोहन यांच्या सांगीतिक प्रवासाचा आस्वादक दस्तऐवज आहे.
हे पुस्तक म्हणजे मदन मोहन यांचे चरित्र नाही किंवा त्यांच्या गाण्यांचे रूढ अर्थाने रसग्रहण नव्हे. तरीही थोडक्या पृष्ठांत मदन मोहन यांच्या संगीताच्या जादूचे मर्म टिपण्याचा यशस्वी प्रयत्न आहे. लेखकाने पुस्तकाच्या सुरुवातीस ‘संन्यस्त पारिजात’ या प्रकरणात मदन मोहन यांच्या कारकीर्दीचा विचक्षण वेध घेतला आहे. रायबहादूर चुन्नीलाल कोहली यांचे पुत्र मदन मोहन यांचा बगदाद येथे झालेला जन्म, त्यानंतर या कुटुंबाने फाळणीपूर्व लाहोरमध्ये आणि पुढे मुंबईत हलविलेला मुक्काम, हिमांशू रॉय यांनी स्थापन केलेल्या ‘बॉम्बे टॉकीज’ संस्थेत चुन्नीलाल यांनी केलेली गुंतवणूक, संगीताची ओढ असलेल्या आपल्या मुलाने मात्र या क्षेत्रात कारकीर्द करण्यास वडिलांचा असणारा विरोध, वडिलांच्या सूचनेवरून मदन मोहन यांनी सैन्यात घेतलेला प्रवेश, तेथे मन न रमल्यामुळे सैन्याला रामराम ठोकून लखनौ आकाशवाणी केंद्रात ‘सहायक संगीत दिग्दर्शक’ म्हणून मिळवलेली नोकरी, पुढे दिल्लीला बदली झाली म्हणून त्या नोकरीकडेही पाठ फिरवून पुन्हा मुंबई गाठण्याचा घेतलेला निर्णय, संगीत क्षेत्रातच कारकीर्द करण्याच्या हट्टावरून वडिलांशी उडालेले खटके आणि त्यामुळे दिग्दर्शक ओ. पी. दत्ता यांच्या घरी केलेले वास्तव्य अशा चढ-उतारांचा धांडोळा लेखकाने घेतला आहे. ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये फूट पडल्यानंतर अशोक कुमार, चुन्नीलाल प्रभृतींनी सुरू केलेल्या ‘फिल्मिस्तान’ संस्थेत मदन मोहन यांनी ‘आँखे’ हा स्वतंत्रपणे संगीत दिलेला पहिला चित्रपट पाहून आधी विरोध करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू; पण दुर्दैवाने त्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत त्यांचे झालेले निधन असे हृद्य व हृदयद्रावक प्रसंग पुस्तकाची खुमारी वाढवतात.
अर्थात या प्रकरणात लेखकाने मदन मोहन यांच्या संगीताची उलगडून दाखवलेली वैशिष्टय़े हे त्याचे मर्म. दुसऱ्या महायुद्धानंतर हिंदी चित्रपट सुरेल संगीताने सजले. अनेक प्रतिभावान गीत लेखक व संगीत दिग्दर्शक चित्रपटसृष्टीत एकत्र आले, याचा मागोवा लेखक घेतोच; पण त्या सगळ्यात मदन मोहन वेगळे कसे होते, याकडेही लक्ष वेधतो. त्यांच्या संगीताचे वेगळेपण हे त्यांच्या ‘गाणेपणात’ होते. त्यांना पूर्णत्वाचा ध्यास होता. चित्रपटसृष्टीतील कोणत्याही ‘लॉबी’त ते अडकले नाहीत. त्यांनी संगीत दिलेले अनेक चित्रपट व्यावसायिकदृष्टय़ा अपयशी ठरले; पण त्यांचे संगीत मात्र अजरामर ठरले. याचा उल्लेख करून रुपेरी पडद्याच्या चौकटी मोडून बाहेर झेप घेण्याची फार मोठी सृजन शक्ती मदन मोहन यांच्या गाण्यात होती आणि आहे, असा अन्वयार्थ लेखक लावतो. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या अप्रतिम गजलांमुळे हिंदी चित्रपटांना एक उच्च साहित्यिक दर्जा प्राप्त झाला, अशा शब्दांत लेखक त्यांचा गौरव करतो. मदन मोहन यांनी संगीत दिलेली गाणी अद्याप तरुण पिढीला भुरळ घालत आहेत, हे लेखक अधोरेखित करतो. मराठीतील राजा परांजपे, अनंत ठाकूर आणि वसंतराव जोगळेकर या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले होते. ते दरवर्षी न चुकता पुण्यातील ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’ला हजेरी लावत. अशा अनवट आठवणींमुळे पुस्तकाची रंगत वाढते. एरवी उमदा स्वभाव असणाऱ्या मदन मोहन यांना पुढे निराशेने ग्रासले आणि वयाच्या अवघ्या पन्नाशीतच त्यांनी जगाचा निरोप घेतला, हा भाग वाचकाला अस्वस्थ करणारा आहे.
लेखकाने मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या निवडक 25 गाण्यांवर टिपणे लिहिली आहेत. ‘प्रीतम मेरी दुनिया में दो दिन तो रहे होते’, ‘बैयां ना धरो ओ बलमा’, ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’, ‘जिया ले गयो जी मोरा सावरिया’, ‘कर चले हम फिदा’ तसेच नक्श लायलपूरी यांनी लिहिलेल्या ‘रस्म-ए-उल्फत को निभाएं तो निभाएं कैसे’ याशिवाय ‘लग जा गले’, ‘ऐ दिल मुझे बता दे’, ‘कौन आया मेरे मन के द्वारे’ अशा सदाबहार गाण्यांची वैशिष्टय़े, आठवणी यांचा समावेश करून लेखकाने मदन मोहन यांच्या अद्भुत प्रतिभेचे विलोभनीय दर्शन घडविले आहे. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पुस्तकात गाण्यांबरोबर ‘क्यूआर कोड’ देण्याची अनोखी संकल्पना. हे कोड स्कॅन करून ते गाणे ऐकण्याचा सांगीतिक अनुभव मिळतो.
लेखकाची रसाळ लेखनशैली, मदन मोहन यांच्या सांगीतिक प्रवासाचे केलेले सूक्ष्म विश्लेषण यांमुळे हे पुस्तक रसिक वाचक आणि अभ्यासकांसाठी संग्राह्य ठरेल.
पुस्तक : गजलगंधर्व मदन मोहन
लेखक : अंबरीश मिश्र
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 109; ह मूल्य : 180/- रुपये

























































