
ई-२० पेट्रोलच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. या व्हिडीओसोबत त्यांनी “दाल में कुछ काला नहीं, बल्कि पूरी दाल ही काली है,” असा टोला लगावला. या इंधनामुळे सर्वसामान्यांची लूट होत असून जुन्या गाड्यांच्या इंजिनचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
राहुल गांधी व्हिडीओत म्हणाले आहेत की, “बंधू आणि भगिनींनो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्याही निवडणूक प्रचारात, आपण कोणते मुद्दे कोणत्या क्रमाने मांडायचे हे ठरवावे लागते. सध्याची समस्या ही आहे की, भ्रष्टाचार इतका वाढला आहे की, आपल्याला प्राधान्यक्रम ठरवण्यासारख्या मुद्द्यांची एक मोठी यादी तयार झाली आहे, पण काळजी करू नका. आम्ही E20 चा मुद्दा गांभीर्याने घेऊ, कारण त्यामुळे लोकांच्या गाड्या आणि स्कूटर्सचे नुकसान होत आहे, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे आणि अक्षरशः त्यांच्या खिशातून पैसे चोरले जात आहेत.”
दरम्यान, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या या धोरणामुळे अनेक वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
E20 पेट्रोल… दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली है! राहुल गांधी यांचा सरकारला इशारा pic.twitter.com/i7I34ItT3P
— Saamana Online (@SaamanaOnline) August 7, 2026




























































