
>> वर्णिका काकडे
तंजावर मराठी बोली (किंवा तंजावूर मराठी) ही तमीळनाडू राज्यातील तंजावर भागात बोलली जाणारी मराठी भाषेची एक जुनी आणि महत्त्वाची बोलीभाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांनी 17 व्या शतकात तंजावर येथे मराठा राज्याची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्रातून गेलेले लोक तेथे स्थलांतरित झाले, त्यातून ही वेगळी बोली विकसित झाली. या भाषेला आता `दक्षिणी मराठी’ असेही म्हटले जाते. तंजावरच्या मराठीला त्याच्या भौगोलिक स्थानामुळे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे विशेष दर्जा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे यांनी सन 1676 मध्ये तंजावर येथे मराठा सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रापासून दूर राहिल्यामुळे आणि तमीळ व कन्नड भाषांच्या सहवासामुळे या बोलीवर दक्षिण भारतीय भाषेचा मोठा प्रभाव पडला.
या बोलीचा उच्चार, शब्दसंग्रह आणि व्याकरण महाराष्ट्रातील प्रमाण मराठीपेक्षा वेगळे आहे. काही जुनी मराठी व मोडी भाषेतील वचने आणि शब्द यात अजूनही सुरक्षित आहेत. तंजावर येथील मराठा राजवटीच्या आणि सरफोजीराजे भोसले यांच्या काळात या भाषेचा व संस्कृतीचा मोठा विकास झाला. आजही तंजावरमध्ये मराठी कुटुंब आहेत जे दक्षिणेकडील परंपरा व भाषा जपत आहे.
आजही काही ठिकाणी तंजावर मराठी बोलली जाते. तंजावरमध्ये आजही भोसले घराण्याचे वंशज राहतात. पॅलेस कॉम्प्लेक्स या राजवाडय़ात भोसले घराण्याचे वंशज राहतात. येथील राजवाडय़ात मराठी सत्तेच्या वैभवशाली इतिहासाच्या खाणाखुणा दिसतात. तंजावर जिह्यात आणि भारतातील तामीळनाडू राज्यात इतरत्र बोलल्या जाणाऱया मराठीचे किमान एक लाख भाषक आहेत.
`एथ्नोलॉग- लॅंग्वेज ऑफ द वर्ल्ड’ या संदर्भ संग्रहात जागतिक भाषा नोंदींमध्ये तंजावर भाषेचा उल्लेख आहे. आज इतक्या शतकांनंतरही मराठी भाषेशी असलेली नाळ घट्ट धरून ठेवण्यात तंजावर मराठी भाषक यशस्वी झाले आहेत.
























































