
एफडीएच्या पथकाने पवई आयआयटीमधील उपहारगृहांची तपासणी केली. यामध्ये दोन कॅन्टीन चालकांनी परवाना न घेतल्याचे उघडकीस आल्याने त्यांना नोटीस बजावत काम थांबवण्याची सूचना दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी “आम्ही जेवायचे कुठे?”, असा संतप्त सवाल एफडीएच्या अधिकाऱ्यांना केला आहे.
येथे देशभरातून आलेली हजारो मुले शिक्षण घेत आहेत. ती वसतिगृहातच राहतात आणि कॅन्टीनमध्येच जेवतात. बुधवारी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आयआयटी मुंबईमधील विविध कॅन्टीनची तपासणी केली. त्यावेळी दोन कॅन्टीनकडे परवाना नसल्याचे, तर एका कॅन्टीनचा परवाना संपलेला असल्याचे आढळून आले. तसेच वैध परवाना असलेल्या एका कॅन्टीनमध्ये अन्न तयार करणे, साठवणूक आणि स्वच्छतेच्या नियमांचे पूर्णपणे पालन केले जात नसल्याने, कार्यप्रणालीत सुधारणा करण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली.
तक्रारीनंतरच कारवाई एफडीए अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई तक्रार मिळाल्यानंतरच करण्यात आली. मात्र, ही तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती की बाहेरील व्यक्तीने, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासणीदरम्यान मोठ्या संख्येने विद्यार्थी कॅन्टीनमध्ये जेवत होते. काही विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना विचारले की, “कॅन्टीन बंद झाल्यावर जेवणाची व्यवस्था कशी करायची?” त्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, जवळच वैध परवाना असलेली अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत, सध्यापुरते तेथून जेवण मागवू शकता.



























































