
‘नीट यूजी २०२६’ च्या परीक्षेच्या निकालात गंभीर त्रुटी असल्याचा दावा करत एका विद्यार्थिनीने हायकोर्टात धाव घेतली आहे. निकालातील या त्रुटीबाबत एनटीएला ईमेलद्वारे वारंवार निवेदने व तक्रारी पाठवल्या, परंतु एनटीकडून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया किंवा उत्तर न मिळाल्याचे सांगत उत्तरपत्रिकेच्या पुनर्तपासणीची मागणी याचिकाकर्त्या विद्यार्थिनीने केली आहे. हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत एनटीएला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत सुनावणी १० ऑगस्टपर्यंत तहकूब केली.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक फटका एका विद्यार्थिनीला बसला आहे. नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या निकालात मोठी तफावत आढळल्याने, विद्यार्थिनीने वडिलांच्या वतीने हायकोर्टात अॅड. तपन थत्ते व अॅड. विवेक आरोटे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रियाज छागला व न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. गुणपत्रिकेत याचिकाकर्ती विद्यार्थिनीला केवळ १४८ गुण दाखवण्यात आले आहेत.
तब्बल ३५० गुणांची ही तफावत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. याशिवाय प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक ९३च्या उत्तराबाबतही आक्षेप घेण्यात आला. विद्यार्थिनीने या प्रश्नासाठी दोन उत्तरे दिली होती. मात्र, त्यातील एका उत्तराचा चुकीचा विचार करण्यात आल्याचा दावा वकिलांनी केला. न्यायालयाने याची दखल घेत केंद्र सरकार तसेच एनटीएला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

























































