‘डिलिमिटेशनला विरोध आहे आणि राहणार’, द्रमुकचा भाजपला धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाला द्रमुक पाठिंबा देणार असल्याची चर्चा द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी आज फेटाळून लावली. “मतदारसंघ पुनर्रचनेला आमचा सुरुवातीपासून विरोध आहे आणि तो यापुढेही कायम राहील,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. द्रमुकचा हा निर्णय भाजपसाठी धक्का मानला जात आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत झालेला द्रमुकचा पराभव आणि काँग्रेसने थलपती विजय यांच्या सरकारला दिलेल्या पाठिंब्यानंतर द्रमुकने ‘इंडिया’ आघाडीपासून फारकत घेतली आहे. संसदेतही द्रमुकचे खासदार स्वतंत्र बसतात. त्यामुळे द्रमुक सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच हे विधेयक संसदेत आल्यानंतर यावर अंतिम भूमिका मांडू, असे वक्तव्य द्रमुकने केले होते. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या होत्या व द्रमुकच्या भूमिकेविषयी संभ्रम वाढला होता. तो संभ्रम उदयनिधी स्टॅलिन यांनी दूर केला आहे. “हा काही नवा मुद्दा नाही. केंद्र सरकारकडून असे दाखवले जात आहे की आम्ही काहीतरी वेगळे करत आहोत, पण आम्ही सगळे जाणून आहोत. आमची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे आणि त्यात बदल होणार नाही,” असे उदयनिधी म्हणाले.