
<< विशाल फुटाणे
[email protected]
गुंटूर येथील श्री शारदा परमेश्वरी देवस्थानातील देवाला प्रणाम करणारे वैशिष्ट्यपूर्ण दगडी शिल्प भारतीय धार्मिक परंपरेतील एका विशिष्ट आचारसंहितेचे उत्कृष्ट दृश्यरूप साकारते. धार्मिक शिक्षणासाठी शिल्पकलेचा उपयोग कसा केला जात असे, याचेच हे एक उदाहरण आहे.
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे असलेल्या श्री शारदा परमेश्वरी देवस्थानम् करताच भक्तांचे लक्ष एका वैशिष्ट्यपूर्ण दगडी शिल्पाकडे वेधले जाते. मंदिराच्या फरशीवर काळ्या दगडात कोरलेल्या या शिल्पात एक पुरुष आणि एक स्त्री भगवंताला प्रणाम करताना दाखविले आहेत. पुरुष संपूर्ण शरीर भूमीवर टेकवून साष्टांग दंडवत घालत आहे, तर स्त्री गुडघे टेकवून, हात जोडून आणि मस्तक झुकवून प्रणाम करताना दाखविली आहे. हे शिल्प पाहून अनेक भाविकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो पुरुष आणि स्त्रियांच्या प्रणाम पद्धती वेगळ्या का आहेत?
भारतीय संस्कृतीत नमस्कार म्हणजे केवळ अभिवादन नव्हे, तो आत्मसमर्पण, नम्रता आणि अहंकाराच्या त्यागाचे प्रतीक आहे. वैदिक काळापासून देव, गुरू, माता-पिता आणि संत यांच्या चरणी दंडवत घालण्याची परंपरा विकसित झाली. शरीर जमिनीवर टेकविणे म्हणजे आपल्या अहंकाराचे विसर्जन करून परमेश्वरापुढे पूर्ण समर्पण व्यक्त करणे, अशी त्यामागील आध्यात्मिक भावना आहे.
साष्टांग हा शब्द अष्ट आणि अंग या दोन शब्दांपासून बनला आहे. धर्मशास्त्रांनुसार हात, पाय, गुडघे, छाती, मस्तक, दृष्टी, मन आणि वाणी या आठ अंगांनी केलेला नमस्कार म्हणजे साष्टांग प्रणाम. येथे केवळ शरीरच नव्हे, तर मन आणि वाणीही परमेश्वराला अर्पण केली जाते. त्यामुळे साष्टांग हा शरीराचा नव्हे, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या समर्पणाचा संस्कार आहे.
स्त्रियांसाठी प्रचलित असलेला पंचांग प्रणाम अनेक दक्षिण भारतीय मंदिर परंपरांमध्ये आढळतो. श्री शृंगेरी शंकराचार्य परंपरेशी संबंधित काही मठांमध्ये स्त्रियांनी वक्षस्थळ व उदर भूमीला न टेकविता गुडघे टेकून प्रणाम करावा, अशी आचारसंहिता सांगितली जाते. यामागे स्त्रीचा सन्मान, शील आणि मर्यादा यांचा विचार असल्याचे सांगितले जाते. गुंटूर येथील या शिल्पामध्येही हाच संदेश कलात्मक पद्धतीने व्यक्त केला आहे.
स्त्रियांनी पंचांग प्रणाम करण्यामागे अनेक तात्त्विक आणि व्यावहारिक कारणे असावीत, असे अभ्यासकांचे मत आहे. भारतीय परंपरेत पृथ्वीला `भूमाता’ आणि स्त्रीलाही `मातृस्वरूप’ मानले जाते. त्यामुळे स्त्रीचे वक्षस्थळ, जे मातृत्व आणि पोषणाचे प्रतीक आहे, ते भूमीला स्पर्श करू नये, अशी सांस्कृतिक भावना काही परंपरांत विकसित झाली असावी. ही संकल्पना स्त्रीच्या गौरवाशी जोडलेली असल्याचे दिसते.
याशिवाय पूर्वीच्या काळी गर्भवती स्त्रियाही नियमितपणे देवदर्शनासाठी मंदिरात जात असत. संपूर्ण शरीराने दंडवत घातल्यास गर्भावर अनावश्यक दाब येण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व स्त्रियांसाठीच गुडघे टेकून किंवा पंचांग पद्धतीने प्रणाम करण्याची प्रथा रूढ झाली असावी.
भारतीय मंदिर स्थापत्याचा अभ्यास केला असता चालुक्य, राष्ट्रकूट, होयसळ, काकतीय, यादव, चोल आणि विजयनगरकालीन मंदिरांतील शिल्पांमध्ये भक्त विविध प्रकारे देवाला वंदन करताना दिसतात. काही ठिकाणी पुरुष आणि स्त्रिया दोघेही दंडवत घालताना दिसतात, तर काही ठिकाणी केवळ अंजलीमुद्रेत उभे राहून नमस्कार करणारे भक्त कोरलेले आहेत. यावरून प्रणामाची एकच पद्धत सर्वत्र होती, असे म्हणणे इतिहासदृष्ट्या योग्य ठरत नाही.
गुंटूर येथील श्री शारदा परमेश्वरी देवस्थानातील हे शिल्प मात्र भारतीय धार्मिक परंपरेतील एका विशिष्ट आचारसंहितेचे उत्कृष्ट दृश्यरूप आहे. शिल्पकाराने कोणतेही शब्द न वापरता पुरुष आणि स्त्री यांच्या प्रणामातील भिन्नता अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची विविधता. एकाच श्रद्धेला विविध प्रदेशांत विविध अभिव्यक्ती लाभल्या आहेत. प्रणामाची पद्धत बदलू शकते, परंतु त्यामागील भक्तिभाव बदलत नाही. भगवंताला अपेक्षित असते ती अंतकरणातील शुद्धता, नम्रता आणि समर्पणाची भावना. म्हणूनच हात जोडून केलेला साधा नमस्कार असो, पंचांग प्रणाम असो किंवा साष्टांग दंडवत-प्रत्येकाचा आध्यात्मिक अर्थ भक्तीमध्येच सामावलेला आहे.
हे शिल्प भारतीय संस्कृतीतील नमस्कार परंपरेचे एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक दस्तऐवज आहे. धार्मिक शिल्पकला, स्थानिक परंपरा आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञान यांचा सुंदर संगम या शिल्पातून दिसून येतो. त्यामुळे या शिल्पाकडे केवळ धार्मिक नियम म्हणून नव्हे, तर भारतीय सांस्कृतिक विविधतेचे आणि परंपरांच्या समृद्ध वारशाचे प्रतीक म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.
(लेखक पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक आहेत.)
























































