
<< सोहम पिंगळीकर
[email protected]
एखादा सिनेमा कोणकोणत्या कारणांमुळे कल्ट ठरू शकतो, याचा विचार करताना `कल्ट ऑब्जेक्ट’सारखी संकल्पनाही समोर येते. तात्या विंचू हे पात्र याचे अगदी उत्तम उदाहरण आहे. मध्यंतरी एक रील पाहण्यात आली. एका पार्टीमध्ये मिकी माऊस, डोरेमॉनऐवजी गुबगुबीत अंगाचा तात्या विंचू नाचत होता. उत्सुकता म्हणून पाहिलं, तर तात्या विंचूचे कपडे आणि बाहुले यांना बाजारात प्रचंड मागणी असल्याचं लक्षात आलं. एकेकाळी पोटात धडकी भरवणाऱ्या या व्हिलनला बाजारात इतकी मागणी कशामुळे आहे? ही `झपाटलेला’ या सिनेमाची लोकप्रियता आहे की तात्या विंचू या पात्राची?
काही वेळा एखादी वस्तू एखाद्या चित्रपटाची ओळख ठरते. उदाहरणार्थ, `दीवार’ किंवा `कुली’ म्हटलं की, 786 नंबरचा बिल्ला आठवतो. अनेकदा काही गोष्टींचा महिमा सिनेमातील अभिनेता, कथानक आणि संवाद या सगळ्यांनाही वरचढ ठरतो. याचं उघड उदाहरण म्हणजे कुठेही हॅण्डपंप दिसला की, आधी `गदर’ आठवतो. ती एक प्रतिमा अभिनेता, कथानक आणि संवाद सगळ्यांनाच पुरून उरते. आता याचा या सदराशी काय संबंध? तर या सदरात आपण फक्त हा सिनेमा कल्ट आणि हा नाही, एवढंच न पाहता एखादा सिनेमा कोणकोणत्या कारणांमुळे कल्ट होऊ शकतो, यावर विचार करत आहोत.
1993 मध्ये `झपाटलेला’ आला, पण त्याआधी लक्ष्या-महेश या जोडगोळीचे `धडाकेबाज’, `थरथराट’ असे सिनेमे आले होते. या सिनेमांमध्ये कवटय़ा महाकाळ, टकल्या हैवान असे लक्षणीय व्हिलन होते. 2005 मध्ये आलेल्या `पछाडलेला’मधली इनामदार, किरकिरे, बाब्या ही पात्रेसुद्धा मजेदार होती. पण तात्या विंचूने जी काही दहशत पसरवली, त्यापुढे ही सगळीच पात्रं फिकी पडली. तात्या मरताना महामृत्युंजय मंत्र म्हणतो आणि त्याचा आत्मा एका बाहुल्यात जाऊन अडकतो. नंतर मनुष्यदेह मिळवण्यासाठी तो लक्ष्याच्या मागे लागतो इतकीच ही कथा. पण या बाहुल्याचे लक्ष्यावर झोपून मंत्र म्हणणे, कुबड्या खवीसच्या खांद्यावर बसणे अशी अनेक दृश्ये पोटात धडकी भरवणारी ठरली.
खरे तर `झपाटलेला’ येण्याआधीच कोठारेंच्या सिनेमाची शैली आणि लक्ष्याची डायलॉग डिलिव्हरी महाराष्ट्रात लोकप्रिय झाली होती. त्यामुळे इथे हा सिनेमा चालला, यात काहीच नवल नाही. पण जेव्हा `खिलौना बना खलनायक’ या नावाने हा चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला, तेव्हाही त्याने लवकरच कल्ट स्टेटस मिळवलं. हिंदी पट्ट्यात लक्ष्याची विशेष ओळख नव्हती. मग कोठारेंची शैली माहिती असण्याचा संबंधच नव्हता. मग तरी लोकांना हा सिनेमा पुन: पुन्हा का पाहावासा वाटला? याचं उत्तर एकच – तात्या विंचू!
बऱ्याच वेळा कथानक, संवाद यांचं डबिंग केलं किंवा सबटायटल्स दिले, तरी इतर प्रदेशांत जाताना सिनेमाचा आशय कमी-जास्त होऊ शकतो. प्रत्येक संदर्भ पोहोचेल, मूळ संवादाची खुमारी तशीच राहील, याची शाश्वती नसते. म्हणून अशा वेळी दृश्य वस्तू अधिक महत्त्वाच्या ठरतात. कारण या वस्तूंना भाषेची किंवा संदर्भाची मर्यादा नसते. कथा कळत नसली, तरी लाल-निळ्या चौकड्यांचा शर्ट घातलेला बाहुला चटकन लक्षात राहतो. म्हणूनच महाराष्ट्राबाहेर `ओम भग्नी भागोदरी’ हा मंत्र माहिती असण्याची शक्यता कमी असली, तरी तात्या विंचू माहिती असणं सहज शक्य आहे.
बसमागे लटकून मुंबईला जाणारा हा बाहुला एकेकाळी अंगावर काटा आणायचा, पण आज 33 वर्षांनी तात्या सिनेमाबाहेर पडून आपले स्वतंत्र आयुष्य जगतो आहे. या पूर्वाश्रमीच्या व्हिलनचे आता एका मॅस्कॉटमध्ये रूपांतर झाले आहे. आज तो टी-शर्टवर झळकतो, त्याच्यासारखे दिसणारे बाहुले बाजारात मिळतात आणि याहून कहर म्हणजे तो पार्ट्यांमध्ये नाचायलासुद्धा येतो. महाराष्ट्राबाहेर दिल्लीपर्यंत तात्या विंचूचे कपडे भाड्याने मिळतात. एआयच्या काळात तर तात्या आणि अॅनाबेल यांची प्रेमकथाही दाखवण्यात आली. या सगळ्या वापरामुळे हा पूर्वाश्रमीचा व्हिलन भीतिदायक न वाटता मजेदार आणि मनोरंजक वाटू लागला आहे. एरवी सिनेमामुळे पात्रं, वस्तू आठवतात, पण इथे मात्र तात्या आधी आठवतो आणि मागाहून सिनेमा. म्हणूनच सिनेमापेक्षा हा बाहुला खरा `कल्ट ऑब्जेक्ट’ ठरला आहे.
पाश्चात्त्य चित्रपटसृष्टीमध्ये अशा ऑब्जेक्ट्सना फार महत्त्व आहे. हॅरी पॉटरची मॅजिक वॉन्ड, स्टार वॉर्सची लाईटसेबर अशा असंख्य गोष्टी विकत मिळतात. या वस्तू विकत घेण्यामागे जपून ठेवणे किंवा मिरवणे हाच उद्देश असतो. अगदी फिल्मवर आधारित पॉपकॉर्न बकेट संग्रही असणं हीदेखील अभिमानाची गोष्ट झाली आहे. घेणाऱ्यांना त्याचा काहीही उपयोग नसला, तरी सिनेमाचा विस्तारित अनुभव म्हणून संग्रहित करण्यासाठी या वस्तू विकत घेतल्या जातात. भारतातसुद्धा सिनेमांवर आधारित पोस्टर्स, स्टिकर्स, वह्या, टी-शर्ट, चैन यांची मोठी पी होते, पण आपल्याकडे त्यांचा `संग्रह’ करण्याची प्रक्रिया मात्र रुजलेली दिसत नाही. भारतीय प्रेक्षक संग्राह्य आणि सिनेमॅटिक किंमत पाहण्यापेक्षा या वस्तूंची उपयुक्तता पाहतो. इथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्यायला हवा. सिनेमावर आधारित विकली जाणारी प्रत्येक गोष्ट `कल्ट ऑब्जेक्ट’ ठरत नाही. भारतीय सिनेसृष्टीने क्रिशचे मास्क, टारझन : द वंडर कार, शाकालाकाची पेन्सिल अशा गोष्टी जरूर विकल्या, पण त्या `खेळणी’ या गटापुरत्याच सीमित राहिल्या.
तात्याचा बाहुला लहान मुलांसाठी भीतिदायक असल्यामुळे तो खेळणं म्हणून विकण्याचा किंवा विकत घेण्याचा प्रश्नच नव्हता. पण हळूहळू या बाहुल्याने भाषेसोबत सिनेमाची चौकटही ओलांडली. सिनेमापेक्षा बाहुला महत्त्वाचा झाला, तशी त्याची मागणी वाढली. प्रेक्षकांनी त्याला कथेपासून वेगळं केलं, त्याचा निरनिराळ्या संदर्भांत वापर केला आणि त्या निर्जीव बाहुल्याला खरोखरच जिवंत केलं. प्रेक्षकवर्गात त्याची छबी पक्की होतीच, पण कोणीतरी कल्पकतेने त्याचा गुबगुबीत कॉस्च्युम तयार केला आणि तात्या लग्नात, जत्रांमध्ये नाचू लागला. इतकंच काय, शाळेच्या गॅदरिंगमध्ये तात्यासारखा मेकअप करून मुलांचे `ओम भग्नी भागोदरी’वरील व्हिडीओही पाहायलाही मिळतात.
तात्याला कोणी कपाटात बंद ठेवण्यासाठी विकत घेतलं नाही. उलट त्याच्यासारखा कॉस्च्युम घालून त्याचा उपयोग केला जातो आहे. अशा प्रकारे विशिष्ट दृश्यरचना, प्रेक्षकांवर असलेली पकड आणि त्यांनी केलेली प्रामाणिक मागणी या सगळ्यांमुळे तात्या विंचू हे एक `कल्ट ऑब्जेक्ट’ बनलं आहे. तुमच्या आवडत्या सिनेमातली अशी एखादी वस्तू आठवते का, जी आज त्या सिनेमापेक्षाही मोठी झाली आहे? आठवून बघा. कदाचित तुम्हालाही एक वेगळा `कल्ट ऑब्जेक्ट’ सापडेल.
(लेखक चित्रपट अभ्यासक व समीक्षक आहेत.)

























































