उमेद – श्रवणाच्या पलीकडचा आवाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उत्तरा मोने

श्रवणदिव्यांग हेमंत भसीनची वाटचाल आयुष्यातील मर्यादांवर मात केल्यास कोणतेही स्वप्न अशक्य नाही, हे सिद्ध करणारी आहे. अथक कष्ट आणि कल्पकतेतून उभा राहिलेला ‘रचनाबिंदू’ हा त्याचा उद्योग याची साक्ष देणारा आहे.

जन्मत प्रत्येकाला आयुष्य समान संधी देत नाही. काहींच्या वाटय़ाला संघर्ष आधी येतो आणि यश नंतर. पण काही माणसं अशी असतात की, ती आपल्या मर्यादांनाच सामर्थ्यात रूपांतरित करतात. श्रवणदिव्यांग असलेल्या हेमंत भसीनची वाटचाल ही अशाच जिद्दीची, कष्टाची आणि स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची प्रेरणादायी कहाणी आहे.

1987 मध्ये जबलपूर येथे जन्मलेल्या हेमंतच्या आयुष्यातील पहिला मोठा संघर्ष अवघ्या अडीच वर्षांचा असतानाच सुरू झाला. तो श्रवणदिव्यांग असल्याचे लक्षात आले आणि त्याच्या शिक्षणासाठी कुटुंबाला अनेक निर्णय घ्यावे लागले. त्या काळी जबलपूरमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्याला भोपाळमधील विशेष निवासी शाळेत दाखल करण्यात आले. लहान वयातच आई-वडिलांपासून दूर राहण्याची वेळ आली, पण या अनुभवाने त्याच्यात स्वावलंबनाची बीजं रोवली. नंतर वडिलांची बदली मुंबईला झाल्यावर त्याने रोचीराम थडानी स्कूल फॉर हिअरिंग इम्पेयर्डमध्ये शिक्षण सुरू केले. याच शाळेत त्याच्या कलागुणांना योग्य दिशा मिळाली.

अभ्यासाबरोबरच चित्रकलेत त्याची विशेष प्रगती झाली. एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट चित्रकला परीक्षा उत्तीर्ण होत असतानाच अनेक स्पर्धांमध्ये त्याने उल्लेखनीय यश मिळवले. ऑल इंडिया कॅमल कलर स्पर्धेतील गौरव, राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील सहभाग, दहावीमध्ये 73 टक्के गुण, गणित, इंग्रजी आणि चित्रकलेतील प्रावीण्य ही त्याच्या गुणवत्तेची साक्ष देणारी उदाहरणे आहेत. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षेत भरतकाम विषयात प्रथम क्रमांक आणि महाराष्ट्र ज्ञानपीठ आयोजित गणित स्पर्धेतील प्रथम क्रमांक या यशांनी त्याची अभ्यासू वृत्ती आणि कौशल्याची व्याप्ती अधोरेखित केली.

मात्र त्याचे अंतिम ध्येय केवळ नोकरी मिळवणे नव्हते. स्वत काहीतरी निर्माण करायचे, स्वतचा व्यवसाय उभा करायचा, ही इच्छा त्याच्या मनात आधीपासूनच होती. 2011 मध्ये एका एम्ब्रॉयडरी कंपनीत ड्रॉइंग मास्टर म्हणून काम करताना त्याने उत्पादननिर्मितीची बारकाईने माहिती घेतली. याच काळात स्वतच्या कल्पनेतून काही वेगळी उत्पादने तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. सुरुवातीला हाताने भरतकाम केलेले रुमाल त्याने तयार केले; पण ग्राहकांना हाताने आणि मशीनने केलेल्या भरतकामातील फरक समजत नसल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. घडय़ाळांवर भरतकाम करण्याचा प्रयोगही सुरुवातीला यशस्वी झाला नाही. मात्र अपयशाने त्याला थांबवले नाही. तयार घडय़ाळांवर कलात्मक भरतकाम करून त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याची ही उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली.

2014 मध्ये भोपाळ येथे असताना प्रधानमंत्री रोजगार योजनेतून कर्ज घेऊन त्याने संगणकाधारित एम्ब्रॉयडरी मशीन विकत घेतली. या निर्णयाने त्याच्या व्यवसायाला नवी दिशा मिळाली. खादी ग्रामोद्योग, एमएसएमई, हस्तशिल्प आणि जीएसटी नोंदणीसह आज त्याचा ‘रचनाबिंदू’ हा उद्योग नवी मुंबईत यशस्वीपणे कार्यरत आहे. दिव्यकला मेळ्यात केंद्रीय समाजकल्याण मंत्र्यांच्या हस्ते त्याच्या उत्पादनांचा ‘श्रेष्ठ उत्पादन’ म्हणून झालेला गौरव ही त्याच्या कष्टांची मोठी पावती ठरली.

त्याच्या उत्पादनांमध्ये केवळ व्यवसाय नव्हता, तर कल्पकतेचा अनोखा स्पर्श होता. लग्नासाठी वधू-वरांची नावे भरतकाम केलेल्या चादरी, ट्रायबल कलेवर आधारित वॉल हँगिंग्स, खादी, रेशीम आणि ज्यूटवर तयार केलेली आकर्षक नोटबुक कव्हर्स, कटवर्क भरतकामाचे पर्यावरणपूरक बॅग्ज अशा अनेक संकल्पनांनी बाजारात हेमंतने एक वेगळी ओळख निर्माण केली. या संपूर्ण प्रवासात त्याची सर्वात मोठी अडचण होती ती ऐकू न येण्याची. अनेकांना सांकेतिक भाषा माहीत नसल्यामुळे संवाद साधणे कठीण व्हायचे. पण त्याने ओठांच्या हालचाली वाचून संवाद साधण्याचे कौशल्य विकसित केले. हीच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद ठरली. तो सांगतो, स्वतच्या पायावर उभे राहण्याची जिद्द आणि आई-वडिलांचे अथक परिश्रम हेच त्याच्या यशामागचे खरे बळ आहे. स्वतच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी आई-वडील प्रदर्शनांत बसत असत. ते पाहून त्याला आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळत गेली.

समाजाच्या दिव्यांगांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबाबतही त्याचे विचार अत्यंत स्पष्ट आहेत. दिव्यांग व्यक्तींकडे दया किंवा सहानुभूतीने नव्हे, तर समानतेने आणि सन्मानाने पाहिले गेले पाहिजे, असे तो ठामपणे सांगतो. हेमंतची कहाणी ही केवळ एका यशस्वी उद्योजकाची कथा नाही; ती आत्मविश्वास, कष्ट, कल्पकता आणि चिकाटीची प्रेरणादायी गाथा आहे. आयुष्यातील मर्यादा स्वीकारून त्यांच्यावर मात करत पुढे जाण्याची तयारी असेल, तर कोणतेही स्वप्न अशक्य राहात नाही, हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.