
गर्दीच्या वेळी वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर मार्गावरून प्रवास करणाऱया मेट्रो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या सुधारित सेवा वेळापत्रकानुसार, गर्दीच्या वेळी या मार्गावरील मेट्रो ट्रेनचे अंतर 3 मिनिटे 20 सेकंदांवरून 3 मिनिटे इतके कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 20 टक्क्यांनी वाढेल, म्हणजेच सुमारे 28 हजार अतिरिक्त प्रवाशांना वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मेट्रो वनकडून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गिकेवरील सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत मुंबई मेट्रो वनकडून ‘मिक्स्ड-लूप’ ऑपरेशन्स सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये एक ट्रेन घाटकोपर आणि अंधेरीदरम्यानच्या छोटय़ा फेरीवर (शॉर्ट लूप) धावेल, तर त्यानंतरची ट्रेन घाटकोपर ते वर्सोवा या नेहमीच्या पूर्ण फेरीवर (फुल लूप) धावेल. आठवडय़ाच्या कामकाजाच्या दिवशी धावणाऱया एकूण मेट्रो फेऱयांची संख्या 476 वरून 484 इतकी वाढेल.



























































