
झारखंड पीएससी-एसएससी परीक्षांमधील अनियमिततेसंदर्भात आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि सरकारी शिष्टमंडळ यांच्यात झालेली चर्चेची दुसरी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सोमवारी 10 ऑगस्ट रोजी विधान भवनाला घेराव घालण्याची घोषणा विद्यार्थ्यांनी केली आहे.
झारखंडमधील पीएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी सहा विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी रात्री सरकारी शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता, त्यानंतर आज विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. परंतु या बैठकीतूनही काही निष्पन्न झाले नाही. मात्र, सरकारने विद्यार्थ्यांना त्यांच्या सूचना सादर करण्यासाठी एक ई-मेल आयडी आणि एक फीडबॅक नंबर जारी केला आहे. आम्ही विविध विद्यार्थी गट आणि हितधारकांना भेटू. सर्व सूचनांचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे मंत्री सुदिब्य कुमार सोनू यांनी बैठकीनंतर सांगितले, विद्यार्थी शिष्टमंडळात रवींद्र पासवान, पीयुष कुमार, राजेश प्रसाद, नीतू कुजूर यांचा समावेश होता.
विद्यार्थी नेते क्रांती यांचा आयसीयूमधून संदेश
या आंदोलनात सहभागी असलेल्या विद्यार्थी नेते राहुल कुमार क्रांती यांनी रुग्णालयाच्या आयसीयूमधून एक भावनिक संदेश जारी केला आहे. जोपर्यंत ते जिवंत आहेत, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढत राहतील, असे सांगून त्यांनी झारखंडमधील सर्व विद्यार्थ्यांना या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे. तसेच गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेले विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांचीही प्रकृती खालावत आहे. त्याचा रक्तदाब आणि रक्तशर्करेची पातळी कमी झाली आहे.



























































