आशीष यादवला रौप्यपदक; नीरज चोप्रानंतर पदक जिंकणारा दुसरा हिंदुस्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा युवा भालाफेकपटू आशीष यादव याने यूजीन येथे सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्यपदक पटकावले. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या अंतिम फेरीत आशीषने तिसऱ्या प्रयत्नात 74.09 मीटर भालाफेक करत पदकावर नाव कोरले. या अंतिम फेरीतील दुसरा हिंदुस्थानी खेळाडू टी. धरनिधरन याने 72.35 मीटरची कामगिरी करत सहावे स्थान मिळवले.

19 वर्षीय आशीष हा 20 वर्षांखालील जागतिक स्पर्धेच्या भालाफेक प्रकारात पदक जिंकणारा नीरज चोप्रानंतरचा दुसरा हिंदुस्थानी ठरला आहे. दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्राने 2016 मध्ये पोलंड येथे झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी नीरजने 86.48 मीटर भालाफेक करत जागतिक कनिष्ठ विक्रम नोंदवला होता.