
श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाला देवदत्त पावल्याचे पाहायला मिळाले. कारण यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल पुरते अपयशी ठरले, तर कर्णधार के. एल. राहुललाही मोठी खेळी साकारता आली नाही. त्याचवेळी देवदत्त पडीक्कलने नाबाद शतक झळकावत टीम इंडियाला तारले आणि त्यामुळेच दुसऱ्या दिवस अखेर टीम इंडियाला 90 षटकांत 6 बाद 357 अशी मजल मारता आली.
यजमान संघाने पहिल्या दिवशी 8 बाद 363 धावांवर आपला डाव घोषित केला. त्यानंतर टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल पहिल्याच षटकात विश्व फर्नांडोच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर पडिक्कल आणि केएल राहुल यांनी 96 धावांची भागीदारी केली. केशरा नुवान्थाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होण्यापूर्वी राहुलने 40 धावा केल्या. देवदत्त पडिक्कल 103 धावा करून दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. पण पंत आणि जुरेल हे लवकर बाद झाले आणि संघाला मोठा हादरा बसला. पंत 2 धावांवर बाद झाला, तर जुरेल रमेश मेंडिसच्या गोलंदाजीवर 1 धावेवर बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि मानव सुथार यांनी 76 धावांची भागीदारी केली. जडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि 63 धावा करून दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. असंका मनोजच्या गोलंदाजीवर पायचीत होण्यापूर्वी मानवने 41 धावा केल्या.
जेव्हा असंका मनोजने मोहम्मद सिराजला बाद केले तेव्हा देवदत्त पडिक्कल क्रीजवर परतला. सराव सामन्यामुळे त्याला पुन्हा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मोठया सामन्यांमध्ये दुखापत न होता मैदान सोडणाऱ्या फलंदाजाला ‘रिटायर्ड आऊट’ मानले जाते आणि त्याला पुन्हा फलंदाजीची संधी मिळत नाही. पडिक्कलने सारांश जैनसोबत मिळून संघाला 300 धावांचा पल्ला पार करून दिला. देवदत्तने यावेळी 18 चौकारांच्या जोरावर 142 धावांची खेळी साकारली.


























































