
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, पणन, दुग्धविकास व पशुसंवर्धन परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ‘एनएसई’, वांद्रे (पूर्व) येथे सकाळी १० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.
मागील काही वर्षे जागतिक हवामान बदलाचा परिणाम आंबा, भाजीपाला, फळे, कडधान्य व सर्व प्रकारच्या फलोत्पादनावर होत आहे. परिणामी, कृषी व फलोत्पादनातील शेतकऱ्यांचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटून ४० टक्क्यांवर आले आहे. उत्पन्न घटल्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आले आहेत.
या जिव्हाळ्याच्या समस्यांवर विचारविनिमय करून त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे; निर्यातक्षम व ऑरगॅनिक (सेंद्रिय) उत्पादनावर भर देणे; एपीएमसी व्यतिरिक्त पर्यायी बाजारपेठ (उदा. थेट विक्री केंद्रे) उभारणे; शासनामार्फत शेतकऱ्यांना नवनवीन बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे; तसेच शेतकऱ्यांना काढणीपूर्व व काढणीपश्चात तंत्रज्ञानाची आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती मुख्य संयोजक व महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.

























































