रोह्यात धावीर महाराज की जय SS; नामसप्ताहाची उद्या सांगता धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

१२६ वर्षांची परंपरा असलेल्या धावीर महाराजांच्या वार्षिक नामसप्ताहाची सांगता सोमवारी १० ऑगस्ट रोजी भक्तिमय वातावरणात होणार आहे. त्यानिमित्ताने विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून केवळ रोहाच नव्हे तर परिसरातील असंख्य भाविक सहभागी होणार आहेत. या सप्ताहाच्या निमित्ताने रोह्यात धावीर महाराज की जयऽऽचा गजर घुमत आहे.

१९०१ पासून सुरू असलेली नामसप्ताहाची परंपरा आजही त्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. काळानुरूप व्यवस्थेत बदल झाले असले तरी धावीर महाराजांवरील श्रद्धा, सेवाभाव आणि सामूहिक सहभागाची भावना कायम असल्याचे ज्येष्ठ अभ्यासक स. रा. मेहेंदळे यांनी सांगितले. नामसप्ताहात दररोज काकड आरती, सामूहिक नामस्मरण, पालखी सोहळा, कीर्तन, प्रवचन, भजन, ब्राह्मण भोजन तसेच महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

‘मुलाखतकाराची मुलाखत’
रविवार ९ ऑगस्ट रोजी ‘मुलाखतकाराची मुलाखत’ हा विशेष कार्यक्रम होणार असून वृत्तवाहिनीच्या प्रसिद्ध निवेदिका व युवापिढीच्या पत्रकार प्रज्ञा पोवळे-गांगल यांची मुलाखत अॅड. पल्लवी दाते घेणार आहेत. सायंकाळी पालखी सोहळा व आरती होणार असून या कार्यक्रमासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नामसप्ताहाचे प्रमुख जयेश गोडबोले, ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष अमित आठवले व सचिव निखील दाते यांनी केले आहे.