
पनवेल न्यायालयात आणलेल्या सराईत आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करून एका पोलीस हवालदारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोज जाधव असे मारहाण झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी सादिक खान याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीत राहणारा सादिक खान याला सोनसाखळी चोरी प्रकरणात खांदेश्वर पोलिसांनी अटक केली होती. रिमांडसाठी न्यायालयात आणले असताना नातेवाईकांना भेटू न दिल्याने सादिकने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. यावेळी सादिकने पोलीस हवालदार मनोज जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. मात्र पोलिसावर हल्ला आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी त्याच्यावर तत्काळ नवीन गुन्हा नोंदवला आहे.



























































